लिंबांची आवक वाढल्याने भावात घट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पुणे - मार्केट यार्डातील फळ बाजारात लिंबांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे, त्यामुळे भावात घट झाली आहे. या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले झाल्याने लिंबांचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. लोणचे उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली आहे.

पुणे - मार्केट यार्डातील फळ बाजारात लिंबांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे, त्यामुळे भावात घट झाली आहे. या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले झाल्याने लिंबांचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. लोणचे उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली आहे.

गेल्या चार महिन्यांत लिंबांची आवक कमी झाली होती, त्यामुळे लिंबाचे भाव वधारले होते. गेल्या महिन्यात लिंबांची आवक वाढू लागली; पण त्यामध्ये हिरव्या रंगाच्या लिंबाचे प्रमाण अधिक होते. नोव्हेंबर महिन्यात लिंबांची आवक वाढत गेली. गेल्या आठवड्यात आठ ते दहा हजार गोणी इतकी लिंबांची आवक झाली. रविवारी (ता.27) ही आवक पंधरा हजार गोणीपर्यंत पोचली आहे. थंडी असल्यामुळे स्थानिक आणि परराज्यातून असलेली लिंबांची मागणी कमी झाली. भावांत झालेल्या घटीमुळे परराज्यात लिंबू थेट विक्रीस पाठविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. माल वाहतुकीचा खर्च निघू शकत नसल्याने तेथील बाजारपेठेऐवजी पुण्यातील बाजारात शेतकरी माल पाठवीत आहे, असे अडतदार विलास जाधव यांनी सांगितले.

नगर आणि सोलापूर जिल्ह्यांतून लिंबांची आवक होत आहे. पिवळ्या रंगाच्या मालाचे प्रमाण चांगले आहे. दर वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत लिंबांची आवक वाढत असते. गेल्या दोन वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने या महिन्यांतील हंगामातील आवक अपेक्षित झाली नाही. चांगल्या पावसामुळे पुन्हा एकदा या हंगामातील आवक वाढली आहे. साधारणपणे चांगल्या प्रतीच्या लिंबाला प्रति किलोला 10 ते 13 रुपये आणि हलक्‍या प्रतीच्या लिंबाला प्रति किलोला 6 ते 7 रुपये इतका भाव मिळाला.

Web Title: No demand for lemon; prices down