महावितरण पाहतय खराडीकरांच्या संयमाची परीक्षा; 30 तास अंधारात असूनही...

अन्वर मोमीन
गुरुवार, 4 जून 2020

नागरिक संतप्त; महावितरणच्या कार्यालयात विचारणार जाब

वडगाव शेरी (पुणे) : खराडी भागातील अनेक सोसायट्यांमधील वीजपुरवठा गेले चोवीस तास ते तीस तासांपासून खंडित झाला असून वारंवार तक्रार केल्यानंतरही महावितरणचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नागरिकांनी संतप्त झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी देखभाल व दुरुस्तीचे काम व्यवस्थित न केल्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

...म्हणून भक्कम दिसणारी झाडे पावसाळ्यात पडतात उन्मळून

पावसाचे कारण सांगून महावितरणचे अधिकारी हात वर करीत आहेत. खराडी भागातील गंगा कोन्स्टिला, दिनकर पठारे वस्ती, श्रीराम सोसायटी येथील वीज पुरवठा गेले 24 तासात पासून ते तीस तास उलटून गेल्यानंतरही अद्यापही खंडीतच आहे. याविषयी स्थानिक रहिवासी गौरव शर्मा यांनी महावितरणकडे अनेकदा तक्रार केल्यानंतरही त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. वीज पुरवठा सुरळीत होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्याशी संपर्क साधला. त्यासोबत दिनकर पठारे वस्ती आणि श्रीराम सोसायटी येथील रहिवाशांनी नगरसेवक महेंद्र पठारे यांच्याशी संपर्क साधून वीज नसल्याची तक्रार केली. त्यामुळे आमदार सुनील टिंगरे व स्थानिक नगरसेवक महेंद्र पठारे यांनी सुद्धा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा केला मात्र अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.

पुण्यातील काही उद्याने उघडली; पण...

याविषयी महेंद्र पठारे म्हणाले, पावसाळ्यात तास-दोन तास नागरिक समजून घेऊ शकतात. परंतु चोवीस तास ते तीस तास ही जर वीज पुरवठा सुरळीत होत नसेल तर महावितरणचे अधिकारी नेमके काय करतात. संतप्त नागरिकांनी जाब विचारण्यासाठी जर कायदा हातात घेतला तर याला जबाबदार कोण. वीज पुरवठा नसल्यामुळे व्यवसायिक, ज्येष्ठ नागरिक यांचे खूप हाल होत आहेत. आमदार सुनील टिंगरे म्हणाले, या विषयी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आहे. तरीही जर अधिकाऱ्यांनी आश्वासनांवर बोळवण केली तर संविधानिक मार्गाने जाब विचारून संबंधितांवर कारवाईची मागणी करणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनकर पठारे वस्ती येथील रहिवासी गणेश वडघुले म्हणाले, 24 तासापासून लाईट नाही. घरातील  मोबाईल, इन्वर्टर बंद पडले आहेत. महावितरणचे अधिकरी  वीज वाहिन्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे कारण सांगतात आणि तासाभरात लाईट येईल असे खोटे आश्वासन देतात. परंतु चोवीस तास उलटूनही लाईट आलेली नाही. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व रहिवासी महावितरणच्या कार्यालयात जाणार आहोत. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता वसंत होनराव म्हणाले, पावसामुळे विद्युत रोहित्रात बिघाड झाला, वाहिन्या पाण्यामुळे खराब झाल्या. त्यामुळे दुरुस्तीला वेळ लागला. गंगा कोन्स्टिला सोसायटीचा अंतर्गत बिघाड आहे. वीजपुरवठा लवकर सुरळीत करू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no electricity for 30 hours in Kharadi