आयटी पार्कमध्ये वीज ‘गूल’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

हिंजवडी-माण आयटी परिसर व रायसोनी इंडस्ट्रिअल पार्कमधील सुमारे सोळाहून अधिक कंपन्यांना वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसला.

हिंजवडी - हिंजवडी-माण आयटी परिसर व रायसोनी इंडस्ट्रिअल पार्कमधील सुमारे सोळाहून अधिक कंपन्यांना वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसला.

काही ठिकाणी केबल ब्रेक झाल्याने हिंजवडीचा परिसर गेली तीन दिवस अंधारात होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह रात्र अंधारात काढण्याची नामुष्की हिंजवडीकरांवर आली. इंडस्ट्रिअल भागात बत्ती गूल असल्याने येथील बहुतांश कंपन्यांचे कामकाज ठप्प झाले होते. वारंवार तक्रारी करूनही अपुऱ्या मनुष्यबळाअभावी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने व्यावसायिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. 

या बाबत कंपनी चालकांच्या तक्रारी व हिंजवडीतील व्यावसायिकांकडून तक्रारींचा पाढा सुरू झाल्याने अखेर वीज वितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांनी सोमवारी (ता. २९) जातीने लक्ष घालून हिंजवडीतील काही ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत करून घेतला. युवा लघुउद्योजक संदीप जाधव म्हणाले, ‘‘विजेच्या लपंडावाने लघुउद्योजकांसह सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. आयटी सेक्‍टरसारख्या संवेदनशील भागात चोवीस तासात एक तरी फेज नादुरुस्त असतो. त्यामुळे उद्योग व्यवसाय करायचे कसे? आठवड्यातून तीन-चार दिवस विजेच्या अडचणी सुरूच आहेत. अंधाराचा फायदा घेत परिसरात चोऱ्याही वाढल्या आहेत. वीज वितरण कंपनीने अधिकचे मनुष्यबळ व अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली पाहिजे.’’ 

हिंजवडीचे ग्रामपंचायत सदस्य उमेश साखरे म्हणाले, ‘‘हिंजवडीसारख्या उपविभागीय कार्यालयात नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यायला एकही अधिकारी हजर नसतो. मग सर्वसामान्य माणसाने न्याय मागायचा कुणाकडे? हिंजवडीचे शाखा अभियंता गेली दोन महिन्यांपासून गायब आहेत. याचे उत्तर वरिष्ठ अधिकारीही देत नाहीत. या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.  वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या समस्येबाबत वायफऴकर म्हणाले, ‘‘फेज दोनच्या भागात केबलचे नुकसान झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तो दुरुस्तीचे काम करून घेतले असून, लवकरच नव्या केबल टाकून घेण्याचे नियोजन आहे. लवकरच पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. ’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Electricity in IT Park