कोरेगाव भीमा परिसरात सभा होणार; दंगलीचे गुन्हे असलेल्यांना प्रवेशबंदी! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पुणे : 'कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या परिसरामध्ये सभा घेण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांना परवानगी देण्यात आली आहे', अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज (शुक्रवार) दिली. येत्या एक जानेवारी रोजी विजयस्तंभाच्या परिसरात पाच मैदानांवर सभा घेण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे. 

गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमादरम्यान झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर सरकार आणि प्रशासनाने यंदा काळजी घेतली आहे. या परिसरामध्ये उद्यापासूनच (शनिवार) दहापट पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. कोरेगाव भीमा, विजयस्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर येथे एक जानेवारी रोजी इंटरनेटवर प्रतिबंध असेल. 

या संदर्भात पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 'आनंदराज आंबेडकर, रामसाद आठवले, जोगेंद्र कवाडे यांच्या सभांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जाऊ नयेत, यासाठी पोलिसांचा सायबर सेलही कार्यान्वित करण्यात आला आहे. दंगलीचे गुन्हे नावावर असलेल्यांना 1 जानेवारी रोजी पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे', असे पाटील यांनी सांगितले. 'संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनाही ही बंदी लागू आहे का', या प्रश्‍नावर पाटील म्हणाले, की ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांना ही बंदी लागू होते. 

कोणत्याही सभेवर बंदी घातलेली नाही, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्या ज्या पक्षांचे, संघटनांचे अर्ज आले होते त्या सर्वांचे समाधान केले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: No entry in Koregaon Bhima for those who have criminal cases against them