केंद्र सरकारला पथक पाठवायचं असेल तर पाठवावं; अहवाल देण्याची उपमुख्यमंत्र्यांची तयारी

Ajit_Pawar
Ajit_Pawar

पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे कापूस, भात, सोयाबीन, ऊसपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करून केंद्र सरकारलाही अहवाल देणार आहोत. केंद्र सरकारनेही त्यांना पथक पाठवायचे असेल तर पाठवावे, परंतु नेहमीच्या निकषानुसार मदत करून चालणार नाही. राज्यावर कोरोनाचे संकट आणि आता अतिवृष्टीचे संकट ओढवले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

कोरोना सद्यस्थिती आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी (ता.१६) येथील विधान भवनात बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, राज्य सरकार पुण्यासह सोलापूर, लातूर आणि उस्मानाबादसह इतर जिल्ह्यांतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. पंढरपूर येथे भिंत कोसळून मनुष्यहानी झाली आहे. त्याठिकाणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात ज्या ठिकाणी पुलांचे नुकसान झाले आहे, त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सूचना दिल्या आहेत. 

'जलयुक्त'ची चौकशी सुडबुद्धीने नाही : 
कॅगच्या अहवालानुसार जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्कालीन सरकारमधील जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या कालावधीतच कॅगचा अहवाल आला होता. यामागे सुडबुद्धीने किंवा राजकीय उद्देश नसल्याचे पवार यांनी सांगितले. 

गाळप हंगाम पुढे ढकलला : 
नुकसानग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पथके पाठविण्यात आली आहेत. अतिवृष्टीमुळे गाळप हंगाम दहा दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. 

खडसेंच्या प्रवेशाबाबत माहिती नाही : 
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत पवार म्हणाले, 'राजकीय जीवनात एकमेकांच्या भेटीगाठी होतात. शिवेंद्रसिंहराजे विकासकामांनिमित्त भेटून गेले. इतर राजकीय पक्षातील आमदार भेटून गेले म्हणजे काही काळेबेरे आहे असे नव्हे. खडसे यांच्या प्रवेशाबाबत मला काही माहिती नाही.'

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com