लॉकडाउन नको; उपाय शोधा!;उद्योगांचे रोज १०० कोटींचे नुकसान

लॉकडाउन नको; उपाय शोधा!;उद्योगांचे रोज १०० कोटींचे नुकसान

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील उद्योग आणि सेवा क्षेत्र लॉकडाउनच्या पहिल्या दोन झटक्यांतून अजूनही सावरलेले नाही. त्यातच पुन्हा निर्बंध आले तर, अर्थचक्रावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. पुण्याच्या आसपास सुमारे दोन लाख ४० हजार सूक्ष्म, लघू, मध्यम आणि मोठे उद्योग आहेत. लॉकडाउनचे पुन्हा संकट आले तर कामगार गावांकडे परततील आणि उद्योग क्षेत्र थांबेल. त्यातून उत्पादन, विक्रीवरही परिणाम होईल. परिणामी कामगारांना नियमित वेतन देणेही अवघड होणार आहे. सेवा क्षेत्राचेही बस्तान अजून बसलेले नाही. त्यातच महापालिकेचे नवे निर्बंध लागू होत आहेत. अर्थचक्र सुरळीत होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना पुन्हा खीळ बसू नये, असेच सेवा क्षेत्रातील जाणकरांचे म्हणणे आहे. पुणे आणि परिसरातील उद्योगांवर निर्बंध आणले तर रोज किमान १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान होऊ शकते. त्यातून महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारच्या महसुलावरही परिणाम होईल. 

विद्यार्थ्यांचे दूरगामी नुकसान 
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्येच्या माहेरघरातील शाळा, महाविद्यालयांना पुन्हा एकदा टाळे लागले आहे. भविष्यात पुन्हा थेट शिक्षण सुरू होणार का, याबाबत अद्याप कोणीच शाश्‍वती देऊ शकत नाही. जानेवारी महिन्यात शाळा सुरू झाल्या; तर १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू झाली. हे थेट शिक्षण कोरोनामुळे काही दिवसात बंद करावे लागले. शाळा, महाविद्यालयांतील उपस्थितीचे अल्प प्रमाण पाहता सध्याच्या स्थितीत संस्थाचालक, पालक, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण असावे, असे वाटत आहे. यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक अडचणी येत आहेत. प्रॉक्टिकलसाठी महाविद्यालये सुरू करावी वाटत असले तरी वसतिगृह सुरू होत नाहीत. ऑनलाइन शिक्षणात गुणवत्ता नसल्याने विद्यार्थ्यांचे दूरगामी नुकसान होत आहे. त्यांचे मूल्यांकन करण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. तसेच स्पर्धा परीक्षा तोंडावर आलेल्या असताना कोचिंग क्लासेस बंद होणे उमेदवारांसाठी त्रासदायक ठरत आहे. 

साठेबाजी, कृत्रिम भाववाढ 
कोरोनामुळे पुन्हा लॉकडाउन होणार, अशी अफवा पसरल्यामुळे साठेबाजीला ऊत आला आहे. धास्तावलेल्या नागरिकांनी नेहमीपेक्षा जास्त खरेदी सुरू केली आहे तर, दुकानदारांनी त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कृत्रिम भाववाढही सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉकडाउन करण्यात आला. तेव्हापासूनच बाजारपेठेत साठेबाजीला सुरुवात झाली. नव-नव्या निर्बंधांमुळे त्याला उधाण आले अन त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. तत्कालीन गरज म्हणून चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी त्यांनी केली. त्यात साठेबाजी करणाऱ्यांनी अमाप पैसा कमावला. रोगाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउन संपण्याबाबतची चिन्हे दिसत नसल्याने साठेबाजीला उभारी मिळाली. परिणामी, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दुप्पट, तिप्पट नव्हे, तर पाच-पाच पट वाढल्या. हे सारे नागरिकांनी जवळपास नऊ महिने सहन केले. त्यानंतर जसजशी लॉकडाउनमध्ये शिथिलता आली. तसे भाव जागेवर आले. मात्र, सर्वसामान्यांच्या मनात मात्र लॉकडाउनमुळे धडकी भरते, हे वास्तव आहे. 

कष्टकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न 
घरेलू कामगार, रिक्षाचालक, पथारी विक्रेते, मजूर, हमाल आदी विविध घटक मागील लॉकडाउनमध्ये अक्षरश- होपरळले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोचल्या नाहीत. विक्रेत्यांसाठी जाहीर केलेल्या १० हजार रुपये कर्जाची योजना मूठभर लोकांपर्यंतच पोचली. रेशनवरील धान्यही सगळ्या कष्टकऱ्यांना मिळाले नाही. अनेक सोसायट्यांत घरेलू कामगारांना चार ते सहा महिने प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे त्यांच्यापुढे जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला. या असंघटित वर्गाकडे महापालिकेच्याही कल्याणकारी योजना पोचल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन किंवा कठोर निर्बंध आल्यास पुणे आणि परिसरातील किमान ७ ते १० लाख कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. 

हॉटेल व्यवसाय देशोधडीला लागेल 
हॉटेल व्यवसायाची गाडी तब्बल नऊ महिन्यानंतर सध्या कुठे रुळावर आली आहे. आता पुन्हा लॉकडाउन झाला तर आम्ही देशोधडीला लागू, अशी भीती शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये आहे. सध्या शहरातील सुमारे ७० टक्केच हॉटेल्स सुरू झाली आहेत. या सत्तर टक्क्यांमध्ये मध्यवस्ती आणि उपनगरांमधील हॉटेलांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र आयटी, औद्योगिक क्षेत्र आणि वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेली अनेक हॉटेल्स अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे त्या हॉटेलवर अवलंबून असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. कोरोनापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायात अडीच लाख कामगार होते. ती संख्या सध्या दोन लाखांच्या जवळपास आली आहे. तर उलढाल सुमारे ४० टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने रात्रीची संचारबंदी लागू केल्याचा फटकाही व्यवसायाला बसत आहे. 

कामगारांचे स्थलांतर वाढेल 
घरेलू कामगार, बांधकाम, ड्रायव्हर, माळी, रोजंदारी आणि छोट्या-मोठ्या वस्तूंच्या विक्रीसाठी गावातून शहराकडे तसेच इतर राज्यांतून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतात. मागच्या लॉकडाउनमुळे देशातील काही कोटी स्थलांतरित कामगारांना मदत करणं सरकारलाही अशक्य होऊन बसलं. अनेक नागरिकांचा लॉकडाउनच्या काळात जीव देखील गेला. अन्न-पाण्यावाचून अनेक कामगारांचे हाल झाले. आता परत लॉकडाउन झाला तर मजूर, कामगार यांना मोठा फटका बसेल. कामगारांच्या स्थलांतराचा उद्योग, हॉटेल, बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम होईल. देशाचे मोठे आर्थिक नुकसान होईल. छोटे-मोठे व्यवसाय बुडतील. त्यामुळे सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर कामगारांच्या पोटापाण्याचा विचार करून निर्णय घ्यावा. मुळात कामगारांची जबाबदारी कोणीही घेत नाही. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी ते घरी परतात. हे लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

मानसिक आरोग्यावर परिणाम 
कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी गेल्या वर्षी लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली होती. लॉकडाउन ऐकताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रोजंदारीवर काम करणाऱ्यांना काम नसल्यामुळे तसेच ‘वर्क फ्रॉम होम’मुळे आयटीयन्सच्या कामाचा वाढता ताण यामुळे परिणाम झाला तो त्यांच्या मानसिक आरोग्यावर. तर, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. व्यवसाय बंद झाले. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा प्रश्‍न आणि घरची जबाबदारी या सर्व गोष्टींमुळे लोकांमध्ये मानसिक त्रास, चिंता आणि तणावाचे प्रमाण वाढले होते. गेल्या तीन-चार महिन्यांपासून हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येत होते. मात्र, लॉकडाउन झाले तर एकटेपणा, नोकरी जाण्याची भीती, अनिश्‍चितता निर्माण होऊन त्याचा नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल. 

आरोग्याच्या उपाययोजनांवर हवाय भर 
डॉ. बाबा आढाव (अध्यक्ष, हमाल पंचायत) - लॉकडाउन झाला तर त्याचा सर्वाधिक फटका कष्टकरी वर्गाला बसतो. त्यांचे जगण्याचे हाल होतात. त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. हा वर्ग कामावर गेला नाही तर त्यांच्या घरी अन्न शिजत नाही. काम नाही तर, दाम नाही, असे त्यांना सांगितले जाते. रेशनचे धान्यही त्यांच्याकडे वेळेवर पोचत नाही. खायचीच भ्रांत असल्यामुळे पोषणमूल्य असलेला आहार तर, लांबचीच गोष्ट आहे. त्यामुळे लॉकडाउन किंवा कठोर निर्बंधांमुळे कोरोना कमी होईल, असे वाटत नाही तर महापालिका, राज्य सरकारने आरोग्याच्या उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. 

सुधीर मेहता (अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर) - कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी शक्य तेवढी काळजी घ्यायची गरज आहे; परंतु लॉकडाउन केला किंवा कठोर निर्बंध लागू केले तर, संसर्ग कमी होईल, असे वाटत नाही. सेवा-उद्योग क्षेत्राच्या अस्तित्त्वाचा प्रश्‍न असल्यामुळे नियमाप्रमाणे ते सर्व प्रकारे काळजी घेत आहेत. लॉकडाउनचा फायदा झाला आहे, असे कोठेही दिसून आलेले नाही किंवा तो उपाय आहे, असेही वाटत नाही. महापालिका, राज्य सरकारला अनेक उपाययोजना करणे शक्य आहे. त्यावर भर देऊन ‘हेल्थ सिस्टीम’ मजबूत केली पाहिजे. 

फत्तेचंद रांका (अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ) - लॉकडाउनला आमचा तीव्र विरोध असेल. देशाची, राज्याची, महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे, असे सांगतात. मग सुरू असलेले अर्थचक्र का थांबवता? कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. आरोग्य व्यवस्था सक्षम करा. लोकांना नियमांची अंमलबजावणी करण्याची सक्ती करा. त्यासाठी यंत्रणा निर्माण करा; परंतु लॉकडाउन हा काही उपाय नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करा. निर्बंध लागू करा; परंतु अघोरी उपाययोजना करून उद्योग-व्यापार आर्थिक संकटात आणू नका. 

डॉ. अरुण अडसूळ, (शिक्षण तज्ज्ञ) - शासनाने हे शैक्षणिक वर्ष शून्य वर्ष जाहीर करावे. ज्ञान व माहिती याबाबत तडजोड होऊ नये. जसेच्या तसे पुन्हा वर्ष रिपीट करावे. आयुष्यासह वेळसुद्धा महत्त्वाची आहे. कौशल्य न मिळवता शिक्षण घेणे योग्य नाही. ऑनलाइन शिक्षणाचे नेमके काय झाले, हे कळले नाही. अजूनही अर्धे शैक्षणिक वर्ष बाकी आहे. यासाठी सर्वानुमते निर्णय घ्यावा. स्पर्धा परीक्षा हा मूल्यांकनाचा भाग आहे. त्यात थेट नोकरी मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त खबरदारी घेऊन परीक्षा घेतली जावी. 

अनिल शिदोरे (नेते आणि प्रवक्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना) - लॉकडाउन आर्थिक दृष्टीने अजिबात परवडणारा नाही. पहिल्या लॉकडाउनचा परिणाम आजही आपण भोगतो आहोत. गेल्या वर्षभराच्या काळात उत्तर प्रदेशात मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता तेथे गेलेला कामगार परत इतर राज्यांत स्थलांतरित होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मागील लॉकडाउनचा परिणाम आजही उद्योग व हॉटेल व्यावसायिकांना जाणवत आहे. आजही कामगारांची कमतरता त्यांना भासत आहे. काळजी घेण्यासाठी सर्वसामान्यांत जागरूकता केली पाहिजे; परंतु, लॉकडाउन हा उपाय आहे, असे वाटत नाही. 

गणेश शेट्टी (अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलियर्स असोसिएशन) - मुळातच व्यवसाय कमी व त्यात रात्रीची संचारबंदी लागू केल्याने व्यवसाय पुन्हा ३० टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. पुन्हा लॉकडाउन होतो की काय, या भीतीने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. तसे झाल्यास पुण्यातून परत गेलेला कामगार पुन्हा परत येईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे आता परत पहिल्यासारखा कडक लॉकडाउन नको. नाहीतर आमचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल व व्यवसाय सावरेल, की नाही याची शंका आहे. 

डॉ. कृष्णा कदम (वरिष्ठ मनोविकृतीशास्त्र तज्ज्ञ, ससून) - मनाची तयारी नसल्यामुळे लॉकडाउन केल्यावर नक्कीच लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल; परंतु आता कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनसारखी स्थिती उद्भवू नये, यासाठी वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी झाली तर स्वत-च्या मनाची तयारी करणे आवश्‍यक आहे. 

विद्यार्थी म्हणतात.... 
अभिषेक रोडे - लॉकडाउनमुळे आयुष्य ७-८ महिने पूर्णपणे थांबले होते. आता कुठे परत सगळे रुळावर आले आहे. असे असताना आता पुन्हा धोका वाढतोय ही गंभीर बाब आहे. सापशिडीच्या खेळात जसं ९८ वर सापाच्या जबड्यात अडकून आपण परत शून्यावर पोहोचतो तसेच परत लॉकडाउन झाल्यास आपले रुळावर आलेले आयुष्य परत खूप मागे ढकलले जाईल. 

सिद्धी शिराळकर - जवळजवळ एक वर्षापासून घरातच आहे. कॉलेज नाही, फिरणं नाही, काहीच नाही. अगदी फार लांब जाणं जरी शक्य नसलं तरी मास्क घालून, काळजी घेत घेत बाहेर जाणं तरी होत होतं. पण पुन्हा लॉकडाउन झाला तर पुन्हा २४ तास घरातच राहणं जरा अवघड होईल. त्यापेक्षाही वाईट म्हणजे सगळ्यांची तारांबळ उडेल. अगदी गरज असेल तेव्हाच सगळे नियम पाळून घरातून बाहेर पडू; पण पुन्हा लॉकडउन नको. 

मानसी जोशी - लॉकडाउनचा काळ इतरांसारखाच माझ्यासाठी सुद्धा कठीण होता; पण या काळात आलेला मानसिक ताण सर्वांत जास्त त्रासदायक होता. आत्ता कुठे आपण परत बाहेर पडू शकत आहोत. यामुळे परत लॉकडाउन झाला, तर पुन्हा सामोरं जावं लागणाऱ्या मानसिक ताणामुळे लॉकडाउन नकोच असं वाटत आहे. 

धनश्री जोगळेकर - कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरु झाले असले तरी प्रात्यक्षिक ज्ञान मागे पडत आहे. त्याचप्रमाणे गायन, नृत्य तसेच इतर कलांच्या सादरीकरणावर बंधने येत आहेत. आता कुठे पुन्हा सगळ्याला सुरुवात झाली असताना पुन्हा लॉकडाउन झाला तर सगळंच मागे पडत जाईल, अशी भीती वाटते. 

राहुल सिंग (बॅटरी व्यावसायिक) - मागील लॉकडाउनने आर्थिक कंबरडे मोडून गेले. भाडे व अन्य खर्च चुकला नाही. त्यातून पुन्हा उभारी घेऊन व्यवसाय सुरू केला. लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा आर्थिक घडी बसायलाही खूप वेळ गेला. आता कुठे आर्थिक घडी काहीशी बसण्यास सुरुवात झाली होती. व्यवसायाची मंदीही खूप जाणवत आहे. त्यातच आता पुन्हा कोरोनाचे संकट डोके वर काढू लागले आहे. लॉकडाउनची चर्चाही सुरू आहे. या चर्चेनेच अंगावर काटा येऊ लागला आहे. आता लॉकडाउन झाले तर पुन्हा उभारी घेणे शक्यच नाही. मास्क, सॅनिटायझर, व अन्य काही बंधने ठीक आहेत. 

रेखा आलकुंटे (घरेलू कामगार) - नवऱ्याचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. चार घरची कामे करून चरितार्थ चालवत होते. कसाबसा संसाराचा गाडा सुरू होता. कोरोनाचे संकट आले आणि लॉकडाउन सुरू झाले. सगळी कामे बंद झाली. सहा महिने इकडून-तिकडून मिळणाऱ्या मदतीवर दिवस काढले. आता कुठे पुन्हा कामे मिळाली होती. कसाबसा संसार सुरू आहे. आता पुन्हा कोरोना वाढला म्हणून परत लॉकडाउन होणार असेही म्हणत्यात. आता लोकडाउन झालं ना जगणंच मुश्कील होईल. मास्क वापरतोच आहे. गर्दीतबी जात नाही; पण लॉकडाउन करू नका.

(वार्तांकन:  मंगेश कोळपकर, योगिराज प्रभुणे, ब्रिजमोहन पाटील, सनील गाडेकर, सम्राट कदम, अक्षता पवार, नीलेश कांकरिया, शंकर टेमघरे आणि सागर शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com