फी 12 लाख, पण पावतीच नाही...

फी 12 लाख, पण पावतीच नाही...

उरुळी कांचन (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाने चालु शैक्षणिक वर्षात विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आठशेहुन अधिक विद्यार्थ्याकडून परीक्षा फी, संगणक शुल्क व ई लर्निंग फिच्या नावाखाली बारा लाख रुपये घेतले आहेत. मात्र शैक्षणिक वर्षे संपण्यास महिनाभराचा कालावधी उरला असतानाही, शाळेकडून अद्याप एकाही विद्यार्थ्याला पावती न मिळाल्याने एकुणच शाळेच्या कारभाराविषयी पालकात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

विशेष बाब म्हणजे संपुर्ण चालू शैक्षणिक वर्षात पाचवी ते दहावीच्या वर्गात ई लर्निंगचा एकही तास झालेला नसतांना, शाळेने मात्र ई लर्निंगच्या नावाखाली विद्यार्थ्याकडुन प्रत्येकी पाचशे रुपये फि घेतली असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक आय. एस, मोमिन यांनीही चालु शैक्षणिक वर्षात ई लर्निंगचा एकही तास झाला नसल्याची कबुली दिली आहे. 

सोरतापवाडी येथील पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळ या स्थानिक संस्थेच्या वतीने कुंजीरवाडी जवळ सोरतापवाडी हद्दीत पुरोगामी माध्यमिक विद्यालय ही माध्यमिक विद्यालय चालवले जाते. चालु शैक्षणिक वर्षात विद्यालयात सव्वाआठशे विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच परीक्षा फी, संगणक शुल्क व ई लर्निंग फिच्या नावाखाली प्रती विद्यार्थी दिड हजार रुपये घेतले आहेत. मात्र शैक्षणिक वर्षे संपण्यास महिनाभराचा कालावधी उरला असतानाही, शाळेकडुन अद्याप एकाही विद्यार्थ्याला पावती न मिळाल्याने शाळेच्या पालक संघाचे आनंद कांबळे व अजिंक्य चौधऱी यांनी विद्यालयाचे मुख्याधापक आय. एस. मोमिन यांची भेट घेतली असता वरील प्रकार उघडकीस आला. 

याबाबत अधिक माहिती देतांना पालक संघाचे आनंद कांबळे व अजिंक्य चौधऱी म्हणाले, विद्यालयाने परीक्षा फि, संगणक शुल्क व ई लर्निंग फीच्या नावाखाली शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्रती विध्यार्थी दिड हजार रुपये घेतले आहेत. आमचा फि घेण्यास आजीबात विरोध नाही. मात्र शैक्षणिक वर्षे संपण्यास महिनाभराचा कालावधी उरला असतानाही, शाळेकडुन अद्याप एकाही विद्यार्थ्याला पावती न मिळणे ही बाब गंभीर आहे. त्यातच वर्षभरात ई लर्निंगचा एकही तास झालेला नसतांना, शाळेने मात्र ई लर्निंगच्या नावाखाली विद्यार्थ्याकडुन फि आकारली आहे. ही बाब शुध्द फसवणुक असुन, याबाबतची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. फिच्या पावती बाबत मुख्याध्यापकांना भेटल्यास, त्यांनीही पावती बाबत हात वर केल्याने, याबाबत संस्था चालकांनी उत्तर देण्याची गरज आहे. 

याबाबत स्पष्टीकरण देतांना मुख्याधापक आय. एस. मोमिन म्हणाले, विद्यार्थ्याकडुन परीक्षा फी, संगणक शुल्क व ई लर्निंग फिच्या नावाखाली घेतलेल्या पैशाच्या पावत्या अद्याप दिल्या नाहीत ही बाब खऱी आहे. तर ई लर्निंगची मशीन नादुरुस्त असल्याने, ई लर्निंगचे तास होऊ शकलेले नाहीत हीही बाब खरी आहे. मुलांना फी भरल्याच्या पावत्या देण्याबाबत वारंवार संस्थेच्या विश्वस्थांना विनंती करुनही, त्यांनी याबाबत प्रतिसाद न दिल्याने शाळेचा नाईलाज आहे. दिड हजार रुपयांच्यापैकी पाचशे रुपये परीक्षा फी असुन, परीक्षा फिच्या पावत्या त्वरीत देण्यात येतील. उर्वरीत हजार रुपयांचा संबध संस्थेची येत असल्याने, हजार रुपयाबाबत संस्था चालकच बोलतील. 

दरम्यान याबाबत बोलताना पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळ या स्थानिक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब चोरघे म्हणाले, परीक्षा फि, संगणक शुल्क व ई लर्निंग फिच्या पावत्या तयार आहेत. मात्र त्या देण्यास उशीर झाला ही बाब खरी आहे. संस्थेने संगणक प्रशिक्षण व ई लर्निंग स्वतःच्या अखत्यारीत ठेवल्याने, वरील शुल्काच्या पावत्या येत्या आठवडाभरात देण्यात येतील. तर परीक्षा फिच्या पावत्या शाळा देईल. ई लर्निंगची मशीन नादुरुस्त झाले होते. त्याची दुरुस्ती करण्याचे काम चालु असुन, यात शंका घेण्यासारखे काहीही घडलेले नाही. स्थानिक राजकारणातुन शाळेला व संस्थेला बदनाम करण्यासाठी वरील तक्रार करण्यात आलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com