esakal | पहिला डोस जोमात, दुसरा कोमात!

बोलून बातमी शोधा

vaccination

पहिला डोस जोमात, दुसरा कोमात!

sakal_logo
By
गजेंद्र बडे -सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होताच, पहिल्याच आठवड्यात १० मार्चला लसीचा पहिला डोस घेतला. त्याला आता ५० दिवस उलटून गेले आहेत. तरीही लसीचा दुसरा डोस मिळू शकला नाही. यासाठी लसीकरण केंद्रावर तीन वेळा चकरा मारल्या. पण अगोदर पहिला डोस घेणारांना लस घेऊ द्या. पहिला डोस संपला की दुसरा डोस देऊ, असेच सांगण्यात आले. तीनही वेळा पहिला डोस देता-देताच लस संपली. परिणामी मला अद्याप दुसरा डोस मिळू शकला नसल्याचा अनुभव दौंड येथील रेल्वे कर्मचारी हेमा पितांबरे सांगत होत्या.

लसीकरणाच्या दुसऱ्या डोसबाबतचा त्यांचा अनुभव हा प्रातिनिधिक आहे. हाच अनुभव सहकारी रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आला आहे. आम्हा सर्वांना नियमानुसार २४ एप्रिलपूर्वीच दुसरा डोस मिळायला हवा होता. डोस सोडा, पण दुसरा डोस घेण्याबाबतचा साधा मेसेज किंवा निरोपही मिळत नसल्याचेही पितांबरे यांनी सांगितले.

हेही वाचा: प्लास्टिक पिशवीत अडकून बिबट्याचा मृत्यू

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना लसीकरण वेगाने होत असल्याचे दाखविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ पहिल्या डोसवरच अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे दुसऱ्या डोसकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी ग्रामीण भागातील कोरोना लसीकरणाची स्थिती पहिला डोस जोमात, दुसरा डोस कोमात अशी झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दुसरा डोस मिळेनासा झाला आहे. अनेकांना ४५ दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप दुसरा डोस मिळू शकलेला नाही. मुदतीत डोस मिळणार नसेल तर, अशा लसीकरणाचा उपयोग काय, असा सवाल सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यात १६ जानेवारीला कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला होता. या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलइन वर्कर यांना लस देण्यात आली. त्यानंतर १ मार्चपासून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

हेही वाचा: प्लास्टिक पिशवीत अडकून बिबट्याचा मृत्यू

पहिला डोस घेतल्यानंतर किमान २८ आणि कमाल ४५ दिवसांनंतर दुसरा डोस मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात काही नागरिकांना ६० दिवस होऊनही हा डोस मिळू शकला नसल्याचे जगदाळे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

पहिल्या टप्प्यात पहिला डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ ४७ टक्के कर्मचाऱ्यांनाच दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंटलाइन वर्करच्या लसीकरणाचीही अशीच अवस्था आहे. केवळ ३६ टक्के वर्कर्सना दुसरा डोस मिळाला आहे. दुसऱ्या टप्प्यात लसीकरण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांपैकी केवळ ७ टक्के नागरिकांना तर, ४५ ते ५९ या वयोगटातील केवळ दोन टक्के लोकांना दुसरा डोस मिळू शकला आहे. पुणे जिल्ह्यात २६ एप्रिलपर्यंत एकूण ९ लाख ८ हजार ७७६ जणांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी ८ लाख ९ हजार ८०६ जणांना पहिला तर केवळ ९८ हजार ९७० जणांचाच दुसरा डोस मिळाला आहे.

वेळेत दुसरा डोस द्या ः जगदाळे

कोरोना प्रतिबंधासाठीच्या जिल्हा परिषदेच्या अनेक योजना अपयशी ठरू लागल्या आहेत. लसीकरणही त्याच मार्गाने चालले आहे. सध्या केवळ पहिल्या डोसवर भर दिला जात आहे. यामुळे ग्रामीण भागात दुसरा डोस मिळतच नाही. वेळेत दुसरा डोस मिळणार नसेल तर, या लसीकरणाचा उपयोग शून्य आहे. त्यामुळे केवळ आकडेवारी वाढवू नका. आधी दुसरा डोस वेळेत द्या, अशी मागणी वीरधवल जगदाळे यांनी अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: पुणे स्मार्ट सिटीतर्फे ६३ प्रकल्पांवर काम  सुरू

संवर्गानिहाय झालेले लसीकरण

- संवर्ग ---- पहिला डोस ---- दुसरा डोस ---- दुसऱ्या डोसची टक्केवारी

- आरोग्य कर्मचारी ---- ४७७०६ ---- २१ हजार ९०६ ----- ४७ टक्के.

- फ्रंटलाइन वर्कर ----- ७९ हजार ८६१ ----- २६ हजार २८ ----- ३६ टक्के

- ज्येष्ठ नागरिक ---- ३ लाख ५२ हजार ६४१ ---- ३४ हजार ३५६ ----- केवळ ७ टक्के.

- ४५ वर्षांपुढील ---- ३ लाख २९ हजार ५९८ ---- १६ हजार ६१० ----- केवळ २ टक्के.