esakal | पुणे स्मार्ट सिटीतर्फे ६३ प्रकल्पांवर काम  सुरू

बोलून बातमी शोधा

Pune Smart City

पुणे स्मार्ट सिटीतर्फे ६३ प्रकल्पांवर काम  सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिका आणि ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.’ (पीएससीडीसीएल) या स्वतंत्र कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटीज् मिशन’सह  विविध योजनांच्या अंतर्गत शहरात सुमारे ४,८४९ कोटी रुपयांच्या ६३ प्रकल्पांची  कामे सुरू  आहेत. त्यामुळे  नागरिकांचे जीवन सुखकर होण्याबरोबरच पर्यावरणरक्षण आणि संवर्धनाच्या कामालाही मोठा हातभार लागत आहे. त्यामुळे ‘पुणे स्मार्ट सिटी’ने  राज्यातील १० शहरांत पहिला,  तर देशातील १००  शहरांत चौदावा क्रमांक  राखला आहे.

शहराच्या एका ठरावीक भागासाठीचे आणि संपूर्ण शहरासाठीचे प्रकल्प अशा दोन पातळ्यांवर पुणे स्मार्ट सिटीतर्फे ६३  प्रकल्प प्रस्तावित आहेत.  त्यापैकी १४  प्रकल्प पूर्ण झाले असून, ४९  प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. केवळ स्मार्ट सिटीज् मिशनअंतर्गत १,७२२  कोटी रुपयांच्या  प्रस्तावित  कामांपैकी ४७३  कोटींची कामे पूर्ण झाली आहेत.

त्यासाठी केंद्र सरकारतर्फे ३४१ कोटी, राज्य सरकारतर्फे १७१.५० कोटी तर पुणे महापालिकेतर्फे १०१ कोटी रुपयांचा निधी ‘स्मार्ट सिटी’ला मिळाला आहे.

हेही वाचा: Pune Corona Update: कालच्यापेक्षा आज अधिक रुग्ण; दगावणाऱ्यांची संख्याही वाढली

 स्मार्ट सिटी अंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडी या भागाचा विकास करण्यासाठी मोबिलिटी, लिव्हेबिलिटी आणि सस्टेनॅबिलिटी या मुख्य उद्दिष्टांतर्गत सहा प्रमुख विषय निवडण्यात आले. त्यात भविष्यवेधी पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सार्वजनिक सुविधा, राहणीमान सुधारण्यासाठी पायाभूत सुविधेमधील बदल, सर्वसमावेशक विकास, शाश्वत सुविधांचे निर्माण व लोकांसाठी तंत्रज्ञानाचा वापर या विषयांचा समावेश आहे. सार्वजनिक वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, ई-गव्हर्नन्स व  दळणवळण, आरोग्य व शिक्षण आणि सुखकर राहणीमान अशा गटांमध्ये स्मार्ट सिटीचे ६३ प्रकल्प विभागले असून, त्यातील ३४ प्रकल्प औंध-बाणेर-बालेवाडी भागात सुरू आहेत. उर्वरित प्रकल्प संपूर्ण शहरासाठीचे आहेत.

स्मार्ट सिटीज् मिशनसह पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी), केंद्र सरकारच्या इतर योजना व विविध खात्यांतर्गत येणारी कामे यांचीही पूर्णतः अंमलबजावणी ‘पीएससीडीसीएल’तर्फे केली जाते. ‘पीएमपीएमएल’साठी ‘फेम योजने’अंतर्गत आणलेल्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेस, चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील स्मार्ट मीटर्स, जलवाहिन्या, साठवण टाक्या, तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारली जाणारी परवडणारी घरे, नदी स्वच्छता, डीपी रस्त्यांची कामे इत्यादींचा यात समावेश आहे. विविध पातळ्यांवरील उत्कृष्ट कामगिरीबद्दल चार वर्षांमध्ये पुणे स्मार्ट सिटीला तब्बल २१ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

हेही वाचा: केंद्र सरकार ग्रामसभांचे अधिकार नाकारतेय काय? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची मदत

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान पुणे स्मार्ट सिटीतर्फे सिंहगड रस्त्यावरील कार्यालयात अत्याधुनिक इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारले गेले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कन्टेंमेन्ट झोन, सॅनिटायझेशन इत्यादींवर लक्ष ठेवणे, वैद्यकीय परीक्षण व तातडीची मदत पुरविणे, रुग्णवाढीच्या संभाव्य ठिकाणांचे अंदाज बांधणे इत्यादी कामांमध्ये या सेंटरने महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या लाटेतही हे केंद्र ही भूमिका चोखपणे बजावत आहे.

स्मार्ट सिटी ही आधुनिक नागरी जीवनशैलीशी सुसंगत संकल्पना आहे. नागरी जीवन धकाधकीचे न राहता सुखद आणि पर्यावरणस्नेही असावे, या दृष्टीने प्रत्येक प्रकल्पाचा विचार या संकल्पनेत समाविष्ट आहे. पुण्यात गेल्या पाच वर्षांत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झालेल्या अनेक कामांनी अत्याधुनिक पुण्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. 

- गणेश बिडकर, सभागृह नेता