शेतकऱ्यांबद्दल सरकारला सहानुभूती नाही - बागवे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

पुणे - ""उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यास सरकार प्राधान्य देते; पण गरीब शेतकऱ्यांचा विचार करीत नाही. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल जराही सहानुभूती नाही,'' अशी टीका कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सोमवारी येथे केली. 

पुणे - ""उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यास सरकार प्राधान्य देते; पण गरीब शेतकऱ्यांचा विचार करीत नाही. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल जराही सहानुभूती नाही,'' अशी टीका कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सोमवारी येथे केली. 

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतीमालाला योग्य दर मिळावा आणि मंत्रालयात शेतकऱ्याला झालेली मारहाण या विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्या वेळी बागवे बोलत होते. मार्केट यार्डमधील मगर पुतळा ते सातारा रस्त्यावरील उत्सव चौक येथे आंदोलन झाले. यात कॉंग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

बागवे म्हणाले, ""राज्यात गेल्या तीन वर्षांमध्ये नऊ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी निराश झालेला आहे. केंद्राने अचानक केलेल्या नोटाबंदीचा फटकाही शेतकऱ्यांना बसला आहे. या वर्षी चांगली पिके येऊनही सोयाबीन, तूर या सारख्या पिकांना योग्य भाव मिळाला नाही. भाजपने आपली सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले; पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे.'' 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड, चिटणीस संजय बालगुडे, नगरसेवक आबा बागूल, वैशाली मराठे, शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस रमेश अय्यर आदी उपस्थित होते.  या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले आहे.

Web Title: No sympathy to the government about the farmers