Monsoon : मॉन्सून सरासरीइतका; यंदा शिवार भिजणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

"अल निनो'चा प्रभाव नगण्य 
मॉन्सूनचे प्रमाण घटविणाऱ्या आणि दुष्काळाला कारणीभूत मानल्या जाणाऱ्या "अल-निनो' या प्रशांत महासागरातील घटकाचा यंदा फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगताना डॉ. राजीवन म्हणाले, की प्रशांत महासागर आणि हिंद महासागरातील स्थिती अनुकूल आहे. "अल-निनो'चा प्रभाव नगण्य राहील. साहजिकच, मॉन्सूनवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही.

नवी दिल्ली : अवघा देश दुष्काळाच्या झळा सहन करत असताना भारतीय हवामान खात्याने आज बळिराजाला गुड न्यूज दिली. यंदा सरासरी इतका म्हणजे 96 टक्के मॉन्सून राहणार असून, पावसाचा विस्तार देशभरात सर्वत्र असल्याने अवघे शिवार भिजणार आहे. मागील वर्षी 97 टक्‍क्‍यांचा प्राथमिक अंदाज जाहीर करण्यात आला असला तरी, अंतिम सरासरी 91 टक्के एवढीच होती. विशेष म्हणजे यंदा वरुणराजाच्या कृपेवरच "राजा'चं भवितव्यही ठरणार आहे. 

पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव डॉ. एम. राजीवन आणि भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत मॉन्सूनच्या प्राथमिक अंदाजाची घोषणा केली. यावर्षी चांगली बातमी असून, 2019 मध्ये पावसाची दीर्घकालीन सरासरी (एलपीए) 96 टक्के असेल, अशी घोषणा डॉ. एम. राजीवन यांनी या वेळी केली. प्रारंभी मॉन्सूनसाठी "सरासरीच्या जवळपास' असा शब्दप्रयोग डॉ. राजीवन यांनी केला होता. नंतर "सरासरी इतका पाऊस' अशी दुरुस्ती त्यांनी केला; तर शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष चांगले राहील, असा विश्‍वास डॉ. रमेश यांनी व्यक्त केला. भारतात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या काळात मॉन्सूनची सरासरी 96 ते 104 टक्के दरम्यानची आहे. त्यात पाच टक्‍क्‍यांची वृद्धी-घट गृहीत धरली जाते. त्यानुसार यंदा सरासरी इतकाच पाऊस असेल. 1951 ते 2000 पर्यंत मॉन्सूनची सरासरी 89 टक्के राहिली आहे. 

"स्कायमेट'च्या भाकिताला छेद 
अलीकडेच "स्कायमेट' या खासगी हवामान सर्वेक्षण संस्थेने यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी मॉन्सून राहील, असे भाकीत व्यक्त करून चिंता वाढविली होती. मात्र, भारतीय हवामान खात्याने आज मॉन्सूनचा अंदाज जाहीर करताना दिलासा दिला आहे. 

"अल निनो'चा प्रभाव नगण्य 
मॉन्सूनचे प्रमाण घटविणाऱ्या आणि दुष्काळाला कारणीभूत मानल्या जाणाऱ्या "अल-निनो' या प्रशांत महासागरातील घटकाचा यंदा फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगताना डॉ. राजीवन म्हणाले, की प्रशांत महासागर आणि हिंद महासागरातील स्थिती अनुकूल आहे. "अल-निनो'चा प्रभाव नगण्य राहील. साहजिकच, मॉन्सूनवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. सुरवातीला काही काळ म्हणजे जूनमध्ये "अल-निनो'चा परिणाम जाणवेल. मात्र, भारतीय कृषीसाठी महत्त्वाच्या असलेल्या जुलै आणि ऑगस्टमध्ये "अल-निनो' निष्क्रिय झालेला असेल. साहजिकच, मान्सून चांगला राहील. चिंतेचे काहीही कारण नाही. पावसाचे वितरणही सर्वत्र चांगले राहणार असल्याने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना फायदा होईल, असा निर्वाळाही त्यांनी दिला. दरम्यान, मॉन्सूनचा सुधारित अंदाज मेचा अंतिम आठवडा किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल, तर चार भौगोलिक भागांमधील पावसाचा अंदाज यानंतर जाहीर केला जाईल. 

वादळाचा इशाराही मिळणार 
हवामान खात्याने दोन वर्षांपासून वादळाचा अतिदक्षतेचा इशारा देण्यास सुरवात केली आहे. प्रशासकीय यंत्रणांना याबाबतची तातडीने माहिती दिली जाते. सर्वसामान्यांना माहिती मिळावी यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जाणार आहे, तर या वर्षापासून वीज पडण्याचाही इशारा दिला जाणार आहे. वीज पडून माणसे, जनावरे दगावण्याच्या घटना वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा इशारा देण्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे. विलासराव देशमुख विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारची सेवा सुरू करण्याचे आदेश हवामान खात्याला दिले होते.

Web Title: Normal Monsoon in the country this year The probability of 96 percent rain