नैर्ऋत्य मॉन्सूनचा हंगाम संपला

नैर्ऋत्य मॉन्सूनचा हंगाम संपला
Published on: 

सकाळ न्यूज नेटवर्क
पुणे, ता. १५ : दक्षिण आणि पूर्व भारतातील उर्वरित भागांसह संपूर्ण देशातून नैर्ऋत्य मॉन्सून बाहेर पडून आता दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रिय झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आज जाहीर केले. यंदा सर्वसाधारण तारखेला, म्हणजे १५ ऑक्टोबरला नैर्ऋत्य मॉन्सूनचा हंगाम संपून ईशान्य मॉन्सूनचा हंगाम सुरू झाला.
मॉन्सूनचा राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू होण्याची सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर असून देशभरातून मॉन्सून १५ ऑक्टोबरला बाहेर पडतो. यावर्षी १९ सप्टेंबरला सुरू झालेला मॉन्सूनचा परतीचा प्रवास सर्वसाधारण वेळेत संपला. मॉन्सूनच्या केरळमधील आगमनापासून मॉन्सून देशातून बाहेर पडेपर्यंतचा सर्वसाधारण कालावधी १३७ दिवस असून, यावर्षी मॉन्सून १३३ दिवस सक्रिय राहिला.
दक्षिण भारतासह दक्षिण, मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात सध्या जमिनीलगतच्या वातावरणात वाऱ्यांची दिशा ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे नोंदली जात आहे. त्याचसोबत तमिळनाडू, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, पुदुच्चेरी, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक आणि केरळच्या काही भागांमध्ये सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊसही झाला. दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रिय झाल्याचे हे निदर्शक असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.
सध्या तमिळनाडू आणि केरळजवळ वातावरणात दोन स्वतंत्र चक्रीय स्थिती सक्रिय असून, उत्तर भारतावरून पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत कमी दाबाची क्षेत्रे प्रवास करण्याचा अंदाज आहे. या स्थितीच्या प्रभावामुळे दक्षिण आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र, जास्त दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे येत्या आठवड्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

अनेक राज्यांत परतीचा पाऊस नाहीच
यंदा मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली नाही. मॉन्सूनोत्तर हंगामाच्या पहिल्या पंधरवड्यात देशात एकूण ६९ टक्के कमी पाऊस नोंदला गेला. महाराष्ट्र आणि गोव्यात याच काळात सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के कमी पावसाची नोंद झाली. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतही सरासरीच्या तुलनेत ६० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस नोंदला गेला.

मॉन्सूनच्या माघारीच्या तारखा
२०२०----------------------- २८ ऑक्टोबर
२०२१----------------------- २५ ऑक्टोबर
२०२२----------------------- २३ ऑक्टोबर
२०२३----------------------- १६ ऑक्टोबर
२०२४----------------------- १५ ऑक्टोबर
२०२५----------------------- १६ ऑक्टोबर
२०२६----------------------- १५ ऑक्टोबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com