चिंचवडमध्ये असाही झाला 'नोटा'चा वापर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

'नोटा'चा प्रभावी वापर करीत एकही उमेदवार पसंत नसल्याचा दिला संदेश... 

पिंपरी (पुणे) : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचे मताधिक्‍य कमी करून आपला सुज्ञपणा दाखविला. त्याच जोडीला 'नोटा'चा प्रभावी वापर करीत एकही उमेदवार पसंत नसल्याचा संदेश पाच हजार 868 मतदारांनी दिला. ही तिसऱ्या क्रमांकाची मते ठरली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांच्या प्रचारासाठी रहाटणीत सभा घेतली होती. त्यांच्यासह शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी विजय निश्‍चित आहे. केवळ मताधिक्‍य किती? याची प्रतीक्षा असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. परंतु, त्यांच्या स्वप्नांवर मतदारांनी पाणी फिरवले आणि 2014 च्या तुलनेत जगताप यांचे मताधिक्‍य घटले. या मतदारसंघात पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी भागात आयटी क्षेत्रातील मतदार सर्वाधिक आहे. शिवाय, नवी सांगवी, पिंपळे गुरव, काळेवाडी, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, वाल्हेकरवाडी, रावेत भागांत नोकरदार, कामगार वर्ग सर्वाधिक आहे. 

पाणीप्रश्‍न असो की कचऱ्याची समस्या, करसंकलन असो की सार्वजनिक सुविधा या विरोधात लगेच आवाज उठवणारा जागृत नागरिक आयटी क्षेत्रातील आहे. पाणी प्रश्‍नाबाबत "नो व्होट'चा नाराही त्यांनी दिला होता. त्या आशयाचे फलक निवडणुकीच्या काळात लावले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतर फलक मागे घेतले होते. त्यामुळेच 11 पैकी एकही उमेदवार पसंत नसल्याचे मत पाच हजार 868 मतदारांनी मतदान यंत्रातील 'नोटा' बटन दाबून व्यक्त केल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. ही तृतीय क्रमांकाची मते ठरली. 

एक लाख 11 हजार 994 मते घेत द्वितीय क्रमांकावर अपक्ष राहुल कलाटे राहिले. चौथ्या क्रमांकाची तीन हजार 950 मते राजेंद्र लोंढे यांना मिळाली. त्या खोलाखाल रवींद्र पारधे यांना एक हजार 474 मते मिळाली. अन्य सहा उमेदवारांना एक हजाराचा आकडाही पार करता आला नाही. तृतीय पंथी नताशा लोखंडे यांना 723 मते मिळाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NOTA button on third position in chinchwad vidhansabha 2019 election results