तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यालाच नोटीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

नसरापूर - शेतातील सर्व माती म्हणजे शेतजमीनच चोरीला गेल्याची तक्रार करून न्यायाची मागणी करणाऱ्या जांभळी (ता. भोर) येथील सर्जेराव कोळपे (वय ७१) यांनाच महसूल विभागाने नोटीस पाठविली आहे. विनापरवाना शेतातील माती काढून अवैधरीत्या वाहतूक केल्याबद्दल दंड का करू नये, अशी विचारणा केली आहे.

मी स्वतःच माहिती देऊन मातीचोरीची तक्रार करून संबंधितांवर कारवाई व नुकसानभरपाईची याचना करत असताना मलाच दोषी ठरवून दंडाची मागणी करणे म्हणजे उलटाच न्याय असल्याची हताश प्रतिक्रिया शेतकरी कोळपे यांनी दिली आहे. कोळपे यांनी त्यांच्या शेतातील सर्व माती शेताजवळील बंधाऱ्याच्या कामासाठी संबंधितांनी चोरून नेल्याची तक्रार सर्वप्रथम महसूल मंडलाधिकारी यांच्याकडे केली होती. यावर काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी भोर तहसीलदार यांच्याकडे दाद मागितली. तेथे देखील काहीच उत्तर न मिळाल्याने त्यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेऊन तक्रार केल्यावर प्रांतांच्या आदेशाने गाव कामगार तलाठी यांनी पंचनामा करून पंचायत समितीच्या वतीने झालेल्या बंधाऱ्याच्या कामासाठी कोळपे यांच्या जमिनीतून विनापरवाना ५७६ ब्रास माती नेण्यात आल्याचा पंचनामा वरिष्ठांना सादर केला आहे.राजगड पोलिस ठाण्यात विनापरवाना माती चोरीप्रकरणी पंचायत समितीच्या लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून, त्याचा तपास चालू आहे. असे असताना महसूल विभागाने पाठवलेल्या नोटिशीबाबत चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Notice to a farmer complaining