बाजार समितीकडून पाच अडत्यांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

फळे व भाजीपाला विभागातील पाच अडत्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाजार समितीने त्यांना परवाने निलंबित करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.

मार्केट यार्ड : फळे व भाजीपाला विभागातील पाच अडत्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाजार समितीने त्यांना परवाने निलंबित करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. याबाबत सात दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी संबंधित अडत्यांना दिला आहे. 

अडत्यांकडून बाजार समितीच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गाळ्यापासून 15 फुटांच्या आत शेतमाल ठेवल्यास आडत्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर गाळ्यासमोर कचरा व राडारोडा टाकणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. 

अशोककुमार द्वारकादास (गाळा क्र.307), विनोद फ्रूट कंपनी (गाळा क्र.303), महालक्ष्मी फ्रूट कंपनी (गाळा क्र.310), लोकमंगल नारायणदास पंजाबी (गाळा क्र.426) आणि मेसर्स कांता सर्जेराव पोमण (गाळा क्र.111 व 112) या गाळेधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच, एका गाळ्यावरील अडत्याच्या कामगाराने बाजार समिती कर्मचाऱ्यांना अरेरावी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notices to five agents from Market Committee