आता इच्छुकांकडून 'ऐच्छिक' निधी

उत्तम कुटे
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पिंपरी - निवडणुकीला प्रमुख राजकीय पक्ष इच्छुकांकडून अर्ज मागवितात. त्याबरोबर ठराविक शुल्कही घेतात. मात्र, यावेळी तीन महिन्यांनी होऊ घातलेली राज्यातील महापालिका निवडणूक त्याला अपवाद ठरली आहे. कारण या अर्ज शुल्काची जागा आता ऐच्छिक निधीने घेतली आहे.

हे शुल्क ठराविक नसून उमेदवाराच्या ताकदीनुसार घेण्यात येत आहे. भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये अशा चारशे इच्छुकांकडून अर्ज शुल्काऐवजी असा "ऐच्छिक निधी' घेतला आहे. त्याला रविवारी (ता.20) शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी जाहीर दुजोरा दिला. पाच हजार रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत "ऐच्छिक निधी' घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. काही दिवसांतच जवळजवळ पाऊण कोटी रुपये या 'ऐच्छिक निधी'च्या माध्यमातून जमा झाले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक इच्छुकांनी आपल्याकडील बाद झालेल्या नोटांच्या स्वरूपात तो जमा केल्याची एक जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काळा पैसा अशा रीतीने पांढरा करण्याचा एक मार्ग राजकीय क्षेत्रात उपलब्ध झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वी ज्यांना उमेदवारी मिळत नव्हती त्यांचे अर्जांचे शुल्क परत केले जात होते. मात्र, यावेळी ऐच्छिक निधीच्या स्वरूपात घेण्यात आलेले हे भरभक्कम शुल्क परत केले जाणार नसून पक्षनिधी म्हणून निवडणुकीत ते वापरले जाणार असल्याचे समजते.
 
Web Title: From now aspirants 'voluntary' funds