आता पिंपरी-चिंचवड शहरभर मिळतेय पुरेसे पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यापासून नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण तब्बल ९० टक्‍क्‍यांनी घटले आहे. शहराच्या अवघ्या दोन-तीन भागांतून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांवर आले असून, त्यांचा त्वरित निपटारा करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे.

पिंपरी - दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यापासून नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण तब्बल ९० टक्‍क्‍यांनी घटले आहे. शहराच्या अवघ्या दोन-तीन भागांतून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांवर आले असून, त्यांचा त्वरित निपटारा करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आमच्या भागातील नळांना पाणीच येत नाही, अनियमितपणे पाणीपुरवठा होतो, पुरेसे पाणी मिळत नाही, कमी दाबाने पाणी येते, रात्री-अपरात्री पाणी भरावे लागते, अशा स्वरूपाच्या तक्रारी शहराच्या सर्वच भागांतून महापालिकेकडे येत होत्या. ‘शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरलेले असतानाही नोव्हेंबर महिन्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याला आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी,’ अशी मागणीही नगरसेवकांनी सभागृहात केली होती, त्यामुळे आयुक्तांनी सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन शहरात समान पाणीवाटप करण्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २५ नोव्हेंबरपासून सुरू केली. या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले असून, सकारात्मक परिणाम दिसू लागले असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांवर आल्याचा दावाही त्यांनी केला. 

माझी लढण्याची प्रेरणा माझी आई आणि सर्वसामान्य माणूस : पवार

असा झाला परिणाम
महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र शहराच्या उत्तरेला निगडी-प्राधिकरण सेक्‍टर २३ मध्ये आहे. तेथून पाणी वितरण केले जाते, त्यामुळे शहराचे शेवटचे टोक असलेल्या दापोडी, दिघी, बोपखेल, चऱ्होली, मोशी, पिंपळे सौदागर आदी भागांतून पाणीपुरवठ्याबाबत सर्वाधिक तक्रारी होत्या. दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यापासून महापालिकेने पाणी वितरण व्यवस्थेत बदल केला. नवीन वेळापत्रकानुसार दिलेल्या वेळेत पुरेसा पाणीपुरवठा होऊ लागला. पूर्वीच्या वेळेपेक्षा दीड ते दोनपटीने पाणीपुरवठ्याची वेळ वाढविण्यात आली. दोन दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले, त्यामुळे बहुतांश भागांत पुरेसे पाणी मिळत असल्याने तक्रारी घटल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

खोदकाम करताना जलवाहिनी फुटणे, नळजोड तुटणे, वाहिन्या चोकअप झाल्याने पाणी न येणे अशा किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी सध्या होत आहेत. सुरवातीला काळेवाडी, रहाटणी भागातून तक्रारी होत्या. त्या सोडविल्या आहेत. सध्या रहाटणी फाटा, पिंपळे गुरवमधील वैदूवस्ती, दिघीतील सावंतनगर भागातील तक्रारी आहेत. त्या सोडविण्यासाठी कामे सुरू आहेत.
- मकरंद निकम, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the city is getting enough water in pimpri chinchwad city