
मधुमेह झालेल्या रुग्णांना नियमितपणे इन्शुलिनची इंजेक्शन घ्यावी लागतात. लहान मुले, गर्भवती, वयोवृद्ध आणि सांधेवातासारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींसाठी इंजेक्शन टोचून घेणे त्रासदायक ठरते. यावर उपाय म्हणून मधुमेहींसाठी तोंडावाटे घेण्याच्या "पेप्टाइड इन्शुलिन'चा शोध राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. हर्षवर्धन अडीकने यांनी लावला आहे.
पुणे ः सध्या वापरात असलेले इन्शुलिन तोंडाद्वारे घेणे शक्य नाही. कारण पोटातील आम्लामुळे इन्शुलिनचे विघटन होते. पर्यायाने अत्यंत कमी प्रमाणात आणि अप्रभावी इन्शुलिन रक्तात मिसळले जाते. पर्याय नसल्यामुळे वर्षानुवर्षे इंजेक्शनद्वारे इन्शुलिन देण्याची पद्धत अवलंबण्यात येत आहे. डॉ. अडीकने यांच्या संशोधनामुळे इन्शुलिन घेण्याचा सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. देशात मधुमेहाचे सर्वाधिक 1 कोटी 52 लाख रुग्ण महाराष्ट्रात आढळतात. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
इन्शुलिनचे विघटन कसे रोखले?
पोटातील आम्लापासून इन्शुलिनचे विघटन रोखण्यासाठी प्रथिनांना "हायड्रॉलिसस'च्या स्वरूपात इन्शुलिन देण्याचा पर्याय निवडण्यात आला. यामध्ये "पेप्टाइड इन्शुलिन'ची 37 अंश सेल्सिअस तापमानाला "पेप्सीन' या पोटातील मुख्य पाचक द्रवामध्ये एक तासाची चाचणी घेण्यात आली. तसेच लखनौ येथील राष्ट्रीय प्राणी प्रयोगशाळेतही "पेप्टाइड इन्शुलिन'ची पचनसंस्थेत चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे 50 टक्के इन्शुलिन रक्तामध्ये मिसळल्याचे आढळून आले. या आधीही असे प्रयोग घेण्यात आले होते, परंतु त्यामध्ये रक्तात मिसळण्याचे प्रमाण फक्त 5 ते 20 टक्क्यांपर्यंत होते.
इन्शुलिन असते तरी काय?
इन्शुलिन हा मानवी शरीरात स्वादुपिंडात तयार होणारा अंतःस्राव आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्समधून साखर (ग्लुकोज) बाहेर काढली जाते किंवा भविष्यातील वापरासाठी ग्लुकोज कार्यान्वित केले जाते. इन्शुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढण्यास (हायपरग्लेसेमिया) किंवा फारच कमी (हायपोग्लेसेमिया) ठेवण्यास मदत करते.
"पेप्टाइड इन्शुलिन'च्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. प्रत्यक्ष वापरासाठी वैद्यकीय चाचण्या होणे आवश्यक असून, औषध कंपन्यांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या पातळीवर आम्ही यासाठी सर्व प्रयत्न करीत आहोत.
- डॉ. हर्षवर्धन अडीकने, शास्त्रज्ञ, एनसीएल