
पुणे - पावसाळ्यात पाणलोट क्षेत्राच्या शेवटच्या भागापासून ते धरणाच्या भिंतीपर्यंत पडणाऱ्या पावसाचे मोजमाप करणारी ‘रिअल डेटा कलेक्शन सिस्टिम अँड फ्लड फोरकास्ट’ आणि धरणांतून पाणी सोडण्याचे अचूक नियोजन व्हावे, यासाठी ‘रिअल टाइम डिस्चार्ज सपोर्ट सिस्टिम’ कृष्णा खोऱ्यातील सर्व धरणांवर बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही सिस्टिमच्या माध्यमातून पूरनियंत्रणाचे काम अचूक पद्धतीने करणे आता शक्य होणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. अतिवृष्टी हे जसे एक कारण यामागे असल्याचे सांगितले जाते, तसे धरणातून पाणी सोडण्यासंदर्भातील योग्य नियोजन न झाल्यामुळे देखील त्याचा फटका बसल्याचे निदर्शनास आले होते. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी आणि सांगली व कोल्हापूर येथील पूरस्थितीतीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला आहे.
त्यामध्ये देखील या दोन्ही सिस्टिम धरणांवर बसविण्यात आल्याचे नमूद केले आहे. २०१४ मध्ये ही योजना हाती घेण्यात आली. त्यासाठी १५० कोटी रूपयांचा निधी पहिल्या टप्प्यात सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार गेल्या पाच वर्षात कृष्णा खोऱ्यातील धरणावर हि सिस्टिम बसविण्याचे काम सुरू होते. गेल्या वर्षी या दोन्ही सिस्टिमची चाचणी घेण्यात आली. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यातील डेटा कलेक्शन सिस्टिम पूर्णपणे कार्यन्वित करता आली नव्हती. मात्र गेल्या वर्षभरात ही तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी पावसाळ्यात पहिल्यांदाच त्यांचा वापर करण्यात येणार आहे.
देशातील पहिला प्रयोग
कृष्णा खोऱ्यातील धरणांवर हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला. आता तो राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सिस्टिममुळे पूराचे नियंत्रण करणे शक्य होणार आहे. देशात अशा प्रकारे राबविण्यात आलेला हा पहिला प्रयोग आहे.
- राजेंद्र पवार, सचिव, जलसंपदा विभाग
धरणसाठ्याबाबत एकच निकष अयोग्य
राज्यातील धरणांमध्ये ऑगस्टपर्यंत कमाल ७० टक्के पाणीसाठा ठेवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यापूर्वी केवळ गतवर्षीच्या परिस्थितीवर निष्कर्ष काढू नये, तसेच महामंडळांकडून अभ्यास करून त्याबाबत नियोजन करणे योग्य ठरेल, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी राज्यातील धरणांमध्ये ऑगस्टपर्यंत कमाल ७० टक्के पाणीसाठा ठेवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर लवकरच ठेवण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच सांगितले. हे धोरण पुणे जिल्ह्यातील धरणांच्या संदर्भात कितपत योग्य ठरेल, याबाबत जलतज्ज्ञांशी चर्चा करून घेतलेला आढावा...
नियोजन करण्याची गरज
डॉ. माधव चितळे, जलतज्ज्ञ तथा सेवानिवृत्त सचिव, केंद्रीय जलसंपदा मंत्रालय
द रवर्षी १५ जुलैपर्यंत धरणात पुरेसा पाणीसाठा असावा, अशा स्वरूपाचे नियोजन करण्यात येते. धरणात पाणी सा ठवून ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीतील, पुणे जिल्ह्यातील धरण साखळीतील पाणलोट क्षेत्रात आणि मराठवाडा तसेच विदर्भातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला एक निकष लावता येणार नाही. सर्वत्र पावसाचे प्रमाण वेगळे आहे.
त्यामुळे कृष्णा खोरे महामंडळ, गोदावरी खोरे आणि तापी खोरे ही महामंडळे त्या- त्या भागातील अभ्यास करून नियोजन करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहेत. या महामंडळांच्या माध्यमातून अभ्यास करून पाणीसाठ्याबाबत योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
अनुभवावरुन निष्कर्ष काढणे चुकीचे
- अविनाश सुर्वे, सेवानिवृत्त सचिव, जलसंपदा विभाग.
धरणातील पाण्याची पातळी किती असावी, याबाबत मागील ४० ते ५० वर्षांच्या पाण्याच्या उपलब्धतेचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार १५ ऑक्टोबरपूर्वी धरणे पूर्ण भरलेली असावीत. पावसाचे दिवस कमी झाले आहेत. पाण्याची पातळी वाढल्यानंतर कालव्याद्वारे पाणी सोडण्याची पद्धत पुणे जिल्ह्यात आहे. उर्ध्व भीमा खोऱ्यात ‘रिअल टाइम फोरकास्टिंग’चा वापर प्रभावीपणे केला जातो. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किती पाऊस पडतो, याची पुण्यातील सिंचन भवनातील कक्षामध्ये दर १५ मिनिटाला माहिती उपलब्ध होते. त्यामुळे पुढील कालावधीत धरणांमध्ये किती पाणी जमा होईल, याचा अंदाज बांधून पाण्याचा वापर करता येऊ शकतो. यासोबतच परदेशातील हवामान संस्थांचीही मदत घेतली जाते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वीच पावसाचा अंदाज मिळतो. गतवर्षी धरणे पूर्ण भरली होती. पाणलोट क्षेत्रातही पाऊस भरपूर झाला होता. केवळ मागील एका वर्षाच्या अनुभवावरुन तांत्रिक निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.