esakal | महत्वाची बातमी : बारामतीकरांनो आता तरी सावध व्हा...नाहीतर...
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

आगामी काळात बारामती परिसरात रुग्णसंख्या वाढली तर त्यांच्यासह त्यांच्या संपर्कातील नागरिकांना ठेवण्यासाठी तीनशे खाटांच्या क्षमतेचे कोविड केअर सेंटर तयार करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु केल्याचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी माहिती दिली. 

महत्वाची बातमी : बारामतीकरांनो आता तरी सावध व्हा...नाहीतर...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरातील तीन तर तालुक्यातील दोन असे पाच जण काल कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर शहर व तालुका आज पुन्हा गॅसवर आहे. नागरिकांनी जर काळजी घेतली नाही तर पुन्हा कठोर उपाययोजनांचा अवलंब करावा लागेल, असा इशारा मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी दिला आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, या पाच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 54 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. 
बारामती शहरातील तीन कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील 31 तर ग्रामीण भागातील दोन कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील 22 जणांचे नमुने घेतले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

शिस्तीचे पालन करण्याची गरज-
शहरातील निर्बंध शिथील झाल्यानंतर लोक मोकळेपणाने व काळजी न घेता फिरत आहेत. गेले काही दिवस शहरात कोरोनाचा रुग्ण सापडलेला नसल्याने लोक अधिकच निर्धास्त झाले होते. अचानकच एकाच दिवशी तीन रुग्ण सापडल्यानंतर शहरात चिंतेचे वातावरण आहे. 

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; काय आहे वाचा

बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने शहरातील दुकानांची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मर्यादीत केलेली असली तरी लोकांनी शिस्तीचे पालन न केल्यास आगामी काळात कठोर उपाययोजना अंमलात आणाव्या लागतील असे किरणराज यादव यांनी स्पष्ट केले. या संदर्भात पोलिस, महसूल, आरोग्य विभागाशी सल्लामसलत केली जाईल. व्यापारी व इतरांसोबतही चर्चा करुनच कठोर निर्णय घ्यायचा की नाही याबाबत ठरविले जाईल. 

तीनशे खाटांच्या क्षमतेचे सेंटर होणार- आगामी काळात रुग्णसंख्या वाढली तर त्यांच्यासह त्यांच्या संपर्कातील नागरिकांना ठेवण्यासाठी तीनशे खाटांच्या क्षमतेचे कोविड केअर सेंटर तयार करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु केल्याचे यादव म्हणाले. 

भाजीपाला लिलावावर परिणाम नाही- भाजीपाला लिलावावर कोणताही परिणाम होणार नाही, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले. शहरात काही ठिकाणी भाजीपाला लिलाव बंद होणार असल्याची चर्चा होती, मात्र असे नाही, हे लिलाव नेहमीप्रमाणे सुरळीत होतील, असे जगताप यांनी स्पष्ट केले. 

पुणेकरांनो, घराबाहेर पडताय? रेनकोट, छत्री सोबत असु द्या, कारण...