कोरोना बधितांची वाढती संख्या चिंतेत टाकणारी; पाहा बारामती, इंदापूर आणि जुन्नरमधील आकडेवारी

Corona_Patients
Corona_Patients

बारामती, इंदापूर, जुन्नर : बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत असल्याने सर्वांच्याच काळजीत दिवसागणिक भर पडत आहे. रविवारी (ता.23) बारामतीतील कोरोनारुग्णांच्या संख्येने 541 चा आकडा गाठला. दिवसभरात बारामतीत 21 जण कोरोनाग्रस्त असल्याचे तपासणीनंतर निष्पन्न झाले. यात बारामती शहरातील 16 आणि ग्रामीण भागातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी घेतलेल्या 115 आरटीपीसीआर नमुन्यापैकी 13 जणांचा तर खाजगी प्रयोगशाळेतील 24 पैकी आठ जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. 

रविवारी आरटीपीसीआर तपासणी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पाटस रोड येथील दोन, शंकर भोई गल्ली येथील चार, खंडोबा नगर येथील दोन, कसबा येथील एक, सिद्धार्थ नगर येथील एक, फलटण रोड येथील एक  व ग्रामीण भागातील काटेवाडी येथील एक आणि वडगाव निंबाळकर येथील एक असे 13 जण आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आले आहेत. एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील देसाई इस्टेट येथील दोन, विवेकानंद नगर येथील एक, सूर्यनगरी येथील एक आणि आमराई येथील एक, वडगाव निंबाळकर येथील एक, वाणेवाडी येथील एक आणि गुणवडी येथील एक अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान रविवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 268 इतकी असून उपचार घेणारे 232 जण आहेत, तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. बारामतीत मृत्यूचीही संख्या वेगाने वाढत असून हे मृत्यू रोखण्यासाठी आता पुण्यातील तज्ज्ञांची मदत आणि मार्गदर्शन स्थानिक प्रशासनाने घ्यायला हवे, अशी मागणी होऊ लागली आहे. गंभीर रुग्णांबाबत पुण्यातील नामवंत डॉक्टरांच्या पॅनेलची नियुक्ती करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचारांची प्रणाली निश्चित करायला हवी, असे लोकांचे म्हणणे आहे.

इंदापूरात आढळले 18 नवे रुग्ण
इंदापूर तालुक्यात 18 जण कोरोना बाधित निघाल्याने तालुक्यात एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 460 झाली आहे. दरम्यान
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी इंदापूर कोविड केअर केंद्रास भेट देवून प्रशासनास कोरोना उपाययोजना गांभीर्याने घ्या, असा मोलाचा सल्ला दिल्यानंतर प्रशासन हलले आहे. बारामती प्रांताधिकाऱ्यांनी ६ ऑगस्ट रोजी हॉस्पिटल अधिग्रहण करण्याच्या दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी २३ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील रुग्णांना तालुक्यात हॉस्पिटलमध्ये खाट मिळत नसल्याने इतर जिल्ह्यात वणवण फिरावे लागत होते, मात्र आता हॉस्पिटल अधिग्रहण झाल्याने रुग्ण आणि नातेवाईकांचा मनस्ताप वाचला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी देशमुख यांचा इंदापूर दौरा फलदायी झाला असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, इंदापूर तालुक्यात शासकीय तपासणीत आठ जण कोरोनाबाधित आढळले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके यांनी दिली. दिवसभरात इंदापूर शहरातील कसबा येथील दोन वर्षीय मुलगा, तीस वर्षीय पुरुष, तालुक्यातील कळाशी येथील 35 वर्षे पुरुष, भिगवण येथील 56 वर्षीय आणि 24 वर्षीय महिला, भाटनिमगाव येथील पाच वर्षीय मुलगी, शेळगाव येथील अकरा वर्षीय मुलगी आणि वालचंदनगर येथील सात वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल आहे.

बारामती येथील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी झालेल्या इंदापूर तालुक्यातील 10 जणांना कोरोनाची लागण आहे. यामध्ये बेलवाडी येथील कोरोना ग्रस्तांच्या संपर्कातील 27 वर्षीय महिला, 32 वर्षे पुरुष यांच्यासह भिगवण येथील एकाच कुटुंबातील 35 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, आठ वर्षीय आणि पाच वर्षीय मुलाचा समावेश आहे. भिगवण येथील एका कोरोनाग्रस्त संपर्कातील 53 वर्षीय पुरुष, 47 आणि 25 वर्षीय महिलेला देखील कोरोनाची लागण झाली आहे. इंदापूर शहर राजवलीनगर येथील एका महिलेला देखील कोरोनाची लागण झाल्याचे खाजगी तपासणीत आढळून आले आहे.

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी इंदापूर तालुक्यातील भिगवण मेडिकेयर हॉस्पिटल आणि यशोधरा ट्रामा केअर अँड आयसीयू या दोन खाजगी हॉस्पिटल्ससह इंदापूर शहरातील यशोदीप हॉस्पिटल लाईफ केअर आयसीयू, श्रेयस नर्सिंग होम, निळकंठ हॉस्पिटल अँड आय सी यु व राऊत हॉस्पिटलच्या डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत. या रुग्णालयात रुग्णांसाठी सर्व सुविधांचा वापर झाल्यास तालुक्याच्या कोरोना मृत्यूदरात निश्चित घट होईल, मात्र प्रशासनाने सजग राहणे गरजेचे आहे.

जुन्नरमधील दोघांचा मृत्यू
गेल्या दोन तीन दिवसात जुन्नर तालुक्यातील कोरोनाबधितांची वाढती संख्या नागरिकांना चिंतेत टाकणारी ठरत आहे. ऐन गणेशोत्सवात प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले असून यावर कडक उपाययोजना करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ओतूर आणि खानगाव येथील कोरोना संसर्ग झालेल्या दोघांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे तालुक्यातील मृतांची संख्या 34 झाली आहे. रविवारी (ता.23) तालुक्यात विक्रमी रुग्ण आढळून आले. यात शिरोली बुद्रुक - 8, काळवाडी- 4, ओतूर, नारायणगाव, वारुळवाडी, काटेडे, आळे- प्रत्येकी 3, बेल्हे, जुन्नर प्रत्येकी 2, ओझर, निरगुडे, उंब्रज नंबर दोन, आर्वी, आळेफाटा, धालेवाडी, धामनखेल, गोळेगाव, कुरण व ठिकेकरवाडी प्रत्येकी एक असे एकूण 41 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्ण संख्या 783 झाली असून यापैकी 520 जण बरे झाले आहेत तर 229 विविध ठिकाणी उपचार घेत असून 34 जणांचा मृत्यू झाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतूर उपबाजार पेठेतील अडतदाराचा मृत्यू झाल्याने रविवारी अडतदार आणि पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहत दिवसभरासाठी कांदा लिलाव बंद करण्यात आला होता. हे लिलाव सोमवारी (ता.24) होणार आहेत. जुन्नर नगरपालिका क्षेत्रात दिवसभरात दोन नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या 81 झाली आहे. यापैकी 16 जण उपचार घेत आहेत, तर 61 जण बरे झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com