मोठी बातमी : कोविडची लस ७३ दिवसांत येणार नाही; वाचा सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा

Corona_Covishield
Corona_Covishield

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची लस बनविण्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आघाडीवर आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या लसीची चाचणी आणि निर्मिती करत आहे. केंद्र सरकारने या लसीच्या उत्पादनासाठी सीरम कंपनीला मंजूरी दिली आहे. काही अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, सीरमची कोविशील्ड ७३ दिवसांत बाजारात उपलब्ध होईल, परंतु कंपनीचे म्हणणे आहे की, जेव्हा सर्व चाचण्या यशस्वी होतील, आणि त्याला नियामक मान्यता मिळेल, तेव्हाच लस बाजारात येईल.

लस कधी उपलब्ध होईल, याबाबत माहिती दिली जाईल - सीरम
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने आम्हाला भविष्यात लोकांच्या वापरासाठी लस तयार करण्यास आणि साठवण्यास परवानगी दिली आहे. कंपनीने स्पष्ट केले की, जेव्हा कोविशील्ड सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी होईल आणि त्यानंतर नियामक मान्यता मिळेल, तेव्हाच ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसची फेज-३ चाचणी सुरू आहे. ही लस कोरोनावर प्रतिरोधक आणि प्रभावी सिद्ध झाल्यानंतरच या लसीच्या उत्पादनाबाबत जाहीर केले जाईल. कमी आणि मध्यम उत्पन्न वर्गातील देशांमध्ये (एलएमआयसी) कंपनीची लस फक्त ३ डॉलर म्हणजे जवळपास २२५ रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

भारतातील १७ केंद्रांवर सुरू आहे चाचणी
नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, ही लस माकडांवर पूर्णपणे प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. त्यांच्यात कोविड -१९ ला रोखू शकेल अशी प्रतिकारशक्ती विकसित झाली. त्यानंतर माणसांवरही २ चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. भारत, ब्राझीलसह जगातील बर्‍याच देशांमध्ये सध्या फेज ३ ची चाचणी सुरू झाली आहे. १७ केंद्रांवरील १६०० जणांवरील चाचणी २२ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. नोव्हेंबरपर्यंत सर्व चाचण्या पूर्ण होणे अपेक्षित आहे. परिणाम चांगले आल्यास आणि नियामक मंजुरी मिळाल्यानंतर लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यास पुढचं वर्ष उजाडू शकतं. 

ऑक्सफर्ड लसीसाठी झालंय बुकिंग
जगभरातील अनेक देशांनी ऑक्सफर्डची लस खरेदी करण्यात रस दाखविला आहे. युनायटेड किंगडमने १०० दशलक्ष लसीचं बुकिंग केलं आहे. तर ब्राझील सरकारनेही १२७ दशलक्ष डॉलर्समध्ये ३० दशलक्ष लसी खरेदी करण्याचा करार केला आहे. अनेक युरोपियन युनियन देश करार करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. ही लस यूकेमध्ये कमी किंमतीत उपलब्ध करून दिली जाईल, असं ऑक्सफर्डने आधीच जाहीर केलं आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com