पोषण आहाराची बिले थकली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

कडूस - खेड तालुक्‍यातील प्राथमिक शाळांची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची शालेय पोषण आहाराची बिले गेल्या सहा महिन्यांपासून थकली आहेत. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी ही बिले संबांधित शाळांना मिळावीत, अशी मागणी खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेने केली आहे.

कडूस - खेड तालुक्‍यातील प्राथमिक शाळांची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची शालेय पोषण आहाराची बिले गेल्या सहा महिन्यांपासून थकली आहेत. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी ही बिले संबांधित शाळांना मिळावीत, अशी मागणी खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेने केली आहे.

खेड तालुक्‍यातील सुमारे ४६५ प्राथमिक शाळांची ऑक्‍टोबर २०१७ ते मार्च २०१८ पर्यंतच्या सहा महिन्यांच्या कालावधीची शालेय पोषण आहाराची बिले थकलेली आहेत. ही रक्कम सुमारे पावणेदोन कोटी रुपयांच्या घरात आहे. ही रक्कम शाळांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात संबंधित शाळांच्या शिक्षकांनी पंचायत समितीकडे वेळोवेळी विनंती केली, परंतु निधी उपलब्ध नसल्याने ही बिले गेल्या सहा महिन्यांपासून थकली आहेत. यात पहिली ते पाचवीपर्यंतचे ऑक्‍टोबर महिन्यापासून तर सहावी ते आठवीपर्यंतचे डिसेंबर महिन्यापासून अनुदान रखडले आहे. यात इंधन खर्च, भाजीपाला खर्च, धान्यादी माल खरेदी, किराणा माल खरेदी व मदतनीस मानधनाचा समावेश आहे. शाळेतील शिक्षकांनी स्वतःच्या खिशातून यातील काही खर्च केला आहे, तर किराणा व तत्सम माल उधारीवर घेतला आहे. या मंडळींकडून वसुलीचा तगादा सुरू झाला आहे, तर संबंधित मदतनीस व पोषण आहार शिजवणारा महिला बचत गट शिक्षकांकडे मानधनाची वारंवार विचारणा करीत आहे. या आर्थिक कोंडीमुळे शाळांचे मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत. यामुळे आर्थिक कुचंबणा होत असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. 

नव्या वर्षात अडचणी
दोन दिवसांनंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. शाळा उघडणार असल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहार द्यावा लागणार आहे. परंतु मागील शैक्षणिक सत्रातील पोषण आहाराचीच बिले अद्याप मिळाली नसल्याने नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच पोषण आहार शिजवण्याबाबत समस्या उदभवू शकते, असे मुख्याध्यापक व शाळाप्रमुखांचे म्हणणे आहे. पंचायत समितीच्या शिक्षण व अर्थ खात्याने या बिलांना मान्यता दिली आहे.

यावर या खातेप्रमुखांच्या सह्या झाल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. परंतु अंतिम मंजुरी लालफितीत रखडली असून, नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी ही बिले संबंधित शाळांच्या खात्यात जमा करावीत, अशी मागणी खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे अध्यक्ष शांताराम नेहेरे यांनी पंचायत समितीकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Nutrician Food bill arrears