'अक्षयपात्र'च्या ताटात पोषण आहार 

'अक्षयपात्र'च्या ताटात पोषण आहार 

पुणे : कोंढवा, वानवडी, हडपसर भागातील महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर शालेय पोषण आहार देण्याचे काम नागपूर आणि ठाणे येथे काम करणाऱ्या एका संस्थेला देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. 
महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना बचत गटांकडून शालेय पोषण आहाराचा पुरवठा होत असून, काही ठिकाणी आहाराबाबत मुख्याध्यापक आणि पदाधिकाऱ्यांकडून तक्रारी येत आहेत. पुरेसा आहार न देणे, भातात भाजीपाल्यासह इतर पदार्थांचे प्रमाण कमी असणे, ठरविलेल्या मेनूनुसार आहार न देणे, आहारवाटपाचे काम विद्यार्थ्यांना करायला लावणे, बचत गटांमधील सदस्यांव्यतिरिक्त इतर महिलांनी आहार शिजविणे, स्वयंपाकघर अस्वच्छ असणे, पाण्याची साठवणूक अस्वच्छ भांड्यात करणे, इत्यादी तक्रारींचा त्यात समावेश होता. 

या पार्श्‍वभूमीवर राज्यातील इतर महापालिकांत शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या संस्थांची माहिती घेणे, उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर), देणगी आणि स्वतःच्या निधीतून चांगला आहार देणाऱ्या संस्थांची माहिती घेण्यात आली होती. ठाणे आणि नागपूर येथे काम करणाऱ्या अक्षयपात्र या संस्थेने या संदर्भात प्रस्ताव दिला होता. या संस्थेला हडपसर- मुंढवा, कोंढवा- येवलेवाडी, वानवडी- रामटेकडी या तीन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत महापालिका शाळांतील एकूण 22 हजार 800 विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर शालेय पोषण आहार पुरविण्याचे काम देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली. 

बचत गटांना सहभागी करून घेणार 
अक्षयपात्र संस्थेला पोषण आहाराचे काम कायमस्वरूपी दिल्यास, या ठिकाणी आहार देणाऱ्या बचत गटांचे काम रद्द होऊ शकते. या बचत गटांना या संस्थेने त्यांच्या कामात सहभागी करून घेण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्य सभेने मान्यता दिल्यानंतर या संस्थेला काम दिले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com