अंगणवाड्यातील बालकांना पोषण आहाराबरोबरच पोषक वडी

संतोष आटोळे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : पुणे जिल्ह्यातील 4 हजार 605 अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहाराबरोबरच आता "पोषक वडी' देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कुपोषित मुले सुदृढ व्हावी आणि बालकांना पौष्टीक आहार मिळावा यासाठी राज्य शासनानेच्या वतीने या उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. या "पोषक वड्या' गरोदर महिला आणि स्तनदा मातांनाही देण्यात येणार आहे. यासाठी विशेष घटक योजनेतून 1 कोटी 89 लाख तर जिल्हा परिषदेकडून अडीच कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे.

शिर्सुफळ (पुणे) : पुणे जिल्ह्यातील 4 हजार 605 अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहाराबरोबरच आता "पोषक वडी' देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कुपोषित मुले सुदृढ व्हावी आणि बालकांना पौष्टीक आहार मिळावा यासाठी राज्य शासनानेच्या वतीने या उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. या "पोषक वड्या' गरोदर महिला आणि स्तनदा मातांनाही देण्यात येणार आहे. यासाठी विशेष घटक योजनेतून 1 कोटी 89 लाख तर जिल्हा परिषदेकडून अडीच कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान बारामती तालुक्यातील शिर्सुफळ केंद्रांर्तगत येणाऱ्या पानसरे वस्ती येथील अंगणवाडीमध्ये बारामती पंचायत समितीच्या उपसभापती शारदा खराडे यांच्या हस्ते पाषक वडी वाटण्यात आली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील 4 हजार 605 अंगणवाड्यांमधील बालकांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये वय, वजन, आणि उंची याबरोबर आहाराची माहिती घेण्यात आली. या तपासणीनंतर जिल्ह्यात 343 बालके ही अतिकुपोषीत तर 1 हजार 523 बालके कुपोषीत आढळून आली. कुपोषित बालकांमध्ये परप्रांतीय आणि स्थलांतरीत मजुरांच्या मुलांची संख्या सर्वात जास्त असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ऊसतोडणी, वीटभट्टी यासह बांधकामासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून कामगार पुणे जिल्ह्यात येतात. पालक दिवसभर कामावर असतात त्यामुळे त्यांच्या मुलांना पोषण आहार मिळत नाही. त्यांचे जीवन च स्थलांतरीत असते. त्याचा परिणाम मुलांच्या आहारावर होतो. तसेच गर्भवती महिलांनाही पुरेशा आहार मिळत नसल्यामुळे नवजात बालकाचे वजन कमी भरते. त्याचा परिणाम शाररिक वाढीवर होतो.

अंगणवाड्यांमधील मुलांना पोषण आहार मिळावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेवून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व बालकांना हा आहार दिला जातो. त्यामध्ये सुकडी, शेवई भात, डाळ खिचडी, लाफशी हे आहार दिले जातात. या आहाराबरोबरच बालकांना आता "पोषक वडी' देण्यात येणार आहे. यासाठी विशेष घटक योजनेतून 1 कोटी 89 लाख तर जिल्हा परिषदेकडून अडीच कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. या पोषण वडीमुळे मुलांना पौष्टीक आहार मिळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील बालकांना या वडीचे वाटप करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

यानुरुप एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प बारामती दोन अंर्तगत येणाऱ्या शिर्सुफळ येथील पानसरेवस्ती येथील अंगणवाडीतील अनुसुचित जाती बालके, गोरदर माता, स्तनदा माता, तसेच कमी वजनांच्या बालकांना उपसभापती शारदा खराडे यांच्या हस्ते पोषण वडीचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी बालकांसाठी दिलेल्या मोफत खाऊचेही वाटप करण्यात आले.यावेळी विस्तार अधिकारी पुनम मराठे, यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका, महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पर्यवेक्षक वृंदा बाप्ते यांनी प्रास्ताविक सुमन जगताप यांनी तर आभार पुणे जिल्हा अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आशाबी शेख यांनी मानले.

ही पोषक वडी विविध पौष्टीक पदार्थांपासून तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये तीळ, आळीव, नाचणी, सोयाबीन, तुप, हरभरा डाळ, मुग डाळ, शेंगदाणे, सुके खोबरे, खारीक, मका, गुळ हे पदार्थ एकत्र करून त्याची "पोषक वडी' तयार करण्यात आली आहे. प्रत्येक बालकांना 200 ग्रॅम वडी देण्यात येत आहे.

Web Title: nutrition food for children at anganwadi