किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत 

किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत 

पुणे : अनेक दिवसांपासून चालू असलेले किरकटवाडी-नांदोशी रस्त्याचे काम म्हणजे जणू काही अडथळ्यांची शर्यत आहे. कारण गेले वर्षभर तरी या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. 
आत्तापर्यंत केवळ मजबुतीकरणापर्यंतच काम झाले आहे. काही ठिकाणी तर अजून मूळ रस्त्याची मजबुतीच बाकी आहे. एकदा झालेले काम बऱ्याच ठिकाणी पावसामुळे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आली आहे. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बऱ्याच वेळा रस्ता वाहून गेला. त्यामुळे पाऊस सुरू होता तोपर्यंत रस्त्याचे काम बंदच ठेवण्यात आले होते. पाऊस उघडल्यानंतर आता पुन्हा जेथे रस्ता वाहून गेला तेथे तो दुरुस्त करण्यात येत आहे. 
किरकटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे, माजी उपसरपंच किरण हगवणे यांनी या रस्त्याचे काम वेगाने करण्याची मागणी केली आहे. नांदोशीचे ग्रामपंचायत सदस्य सागर भरेकर यांनी सांगितले, की ग्रामस्थांना या रस्त्यावरून गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते. मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पडून नागरिक जखमी होत आहेत. खड्ड्यांमध्ये घसरून पडल्याने मागील आठवड्यात एका महिलेचा हात मोडला होता. 
याबाबत पीएमआरडीएच्या पल्लवी सोनवणे व किर्तीकुमार गुरव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही. पीएमआरडीएचे सहायक अभियंता ज्ञानेश्वर आतकरे यांना याबाबत विचारले असता, आता या रस्त्याचे काम वेगाने करण्यात येईल. काही शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केलेली आहे. त्या तक्रारीच्या निरसनानंतर काम होईल. ग्रामपंचायतीचे ड्रेनेज लाइनचे काम सुरू असल्याने आम्हाला रस्त्याचे काम करण्यात अडचणी येत आहेत. ड्रेनेज लाइनला मध्ये बऱ्याच ठिकाणी आडवे क्रॉस असल्याने तेथेही पुन्हा रस्ता उकरला जाणार आहे. ड्रेनेज लाइनच्या कामानंतर काम वेगाने पूर्ण करून घेतले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com