पुण्यात ‘ऑक्‍टोबर हीट’ची चाहूल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम थांबली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे.

पुणे - शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम थांबली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. मात्र, उद्या (ता. २३) हलक्‍या स्वरूपाचा, तर मंगळवारपासून (ता. २४) पुढील दोन- तीन दिवस हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही खात्याने रविवारी वर्तविला.

शहरात गेल्या रविवारपासून ते गुरुवारपर्यंत पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदला जात होता. गुरुवारी कमाल तापमानाचा पारा २९.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला तरीही त्यानंतर पडलेल्या पावसामुळे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम थांबल्याने कमाल तापमान पुन्हा ३० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदले जात आहे. त्यातून पुणेकरांना ‘ऑक्‍टोबर हीट’ची चाहूल लागली.  

अरबी समुद्रातील परिसरात असलेले कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन चोवीस तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. यानंतर पुढील ७२ तासांमध्ये ते ओमानच्या दिशेने सरकेल. यामुळे राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिली आहे. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका जाणवत होता. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात उकाड्यात वाढ झाली. 

बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे येत्या सोमवारी (ता. २३) व मंगळवारी (ता. २४) काही प्रमाणात हवामान ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होण्यास काही दिवसाचा कालावधी बाकी असताना राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. अनेक भागात उन्हाचा चटका वाढत असताना काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहे.  यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: October Heat in Pune