ज्येष्ठ दांपत्यासाठी न्यायाधीश आले खाली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

मुलीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेल्या ज्येष्ठ दांपत्यासाठी न्यायदान करण्यासाठी न्यायाधीश दोन मजले उतरून खाली आले. त्यानंतर दावा निकाली काढत, त्यांना साडेपाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली.

पुणे - मुलीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेल्या ज्येष्ठ दांपत्यासाठी न्यायदान करण्यासाठी न्यायाधीश दोन मजले उतरून खाली आले. त्यानंतर दावा निकाली काढत, त्यांना साडेपाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली.  

सीताराम रामभाऊ चासकर (वय ९५) आणि त्यांची पत्नी शांताबाई (वय ८५, दोघेही रा. म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) असे या ज्येष्ठ दांपत्याचे नाव. त्यांची ६२ वर्षीय मुलगी मंदा यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात मोटार अपघात न्याय प्राधिकरणात ॲड. संतोष चासकर यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. 

मंदा या अंगणवाडी सेविका होत्या. त्या २२ फेब्रुवारी २०१८ रोजी नाशिक फाटा येथे रस्ता ओलांडत असताना मोटारीने त्यांना धडक दिली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी ७ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यांचा हा दावा शनिवारी लोकअदालतीत ठेवण्यात आला होता. अर्जदार हे ज्येष्ठ असल्याने त्यांना चालता व ऐकायला येत नाही. तसेच, त्यांना व्यवस्थित दिसतही नव्हते. या स्थितीत दोन मजले चढून न्यायालयात जाणे शक्‍य नव्हते. त्यामुळे न्यायाधीश एस. आर. नावंदर आणि पॅनेलचे वकील अतुल गुंजाळ यांनी दोन मजले उतरून, चासकर यांना साडेपाच लाख रुपये भरपाई मंजूर केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Old Couple Justice Judge Motivation