ज्येष्ठांनो, तुमचं पुणं तुमच्या सोबत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Old People

ज्येष्ठांनो, तुमचं पुणं तुमच्या सोबत!

पुणे - तुम्ही एकाकी आहात किंवा वयोवृद्ध दांपत्य आहात. कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे किंवा तुमच्या मनात वेगवेगळ्या शंका, भीती निर्माण होत आहेत. तर घाबरू नका, हिंमत तर अजिबात हरायची नाही. तुम्ही एकटे मुळीच नाहीत. तुमचं पुणं तुमच्याबरोबरच आहे. सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, गणेशोत्सव मंडळे, पोलिस, ज्येष्ठ नागरिक संघटना असे विविध समाजघटक तुमच्या मदतीसाठी कायम पुढे असणार आहेत. त्यामुळे आता निर्धास्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या!

डेक्कन परिसरात राहणारे ज्येष्ठ डॉ. सुबीर रॉय यांचा दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरात मृतदेह आढळून आला, तर बेशुद्ध अवस्थेतील त्यांच्या बहिणीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे व सध्याच्या परिस्थितीमुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा पुढे आला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सगळ्याच वयोगटातील नागरिकांना बसत आहे.

विशेषतः मुले परदेशात, दूरगावी असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक शहरात वास्तव्य करीत आहेत. त्यामध्ये एकाकी, ज्येष्ठ दांपत्य व ज्येष्ठ नागरीकांना सध्याच्या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. कधी सेवा-सुशृषा करणारी, स्वयंपाक, धुणीभांडी करणारी व्यक्ती आली नाही, तर कधी औषधे, भाजीपाला आणायचा आहे. तर कधी विनाकारण मनामध्ये विविध प्रकारचे प्रश्‍न निर्माण होतात.

या पार्श्‍वभूमीवरच पुणे पोलिस, ज्येष्ठ नागरिक संघटनांकडून ज्येष्ठांना नेहमीप्रमाणे याही काळात मदतीचा हात देण्यात आला आहे. नागरीकांनी त्यांच्या अडचणी संबंधित ज्येष्ठ नागरिक संघटना, नजीकचे पोलिस ठाणे किंवा पुणे पोलिसांच्या भरवसा सेलमधील ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाशी संपर्क साधल्यानंतर नागरीकांना मदत मिळू शकणार आहे. केवळ तेवढ्यावरच न थांबता ज्येष्ठ नागरीकांनी आपले शेजारी, सोसायटीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते यांच्याशीही संपर्क साधल्यास त्यांच्याकडूनही विविध प्रकारची मदत मिळू शकणार आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्याला गुरुवारी 7,000 रेमडीसिव्हीर मिळणार; बुधवारी 2,366 उपलब्ध

चला सकाळ सोबत बोलूया

सकाळ सोशल फाउंडेशन व कर्वे समाज सेवा संस्थेतर्फे मानसिक स्वास्थ्य व मानसिक समस्यांचे समुपदेशन करण्यासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ ही चोवीस तास मोफत हेल्पलाइन मागील वर्षी सुरू केलेली आहे. सर्व वयोगटातील नागरिकांनी येथे संपर्क साधल्यास तज्ज्ञ समुपदेशक, मानसिक विकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञांकडून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. ‘सकाळ सोबत बोलूया’साठी ०२०-७११७१६६९ या क्रमांकावर मनमोकळेपणाने बोला. आपली व्यक्तिगत माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.

वस्तू मागवा ऑनलाइन

संचारबंदीमुळे एकाकी, ज्येष्ठ दांपत्यांच्या दैनंदिन आयुष्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरीकांनी खाद्यपदार्थ, जेवण, किराणा, भाजीपाला यांसारख्या वस्तू आणण्यासाठी बाहेर पडण्याचे टाळावे. त्यासाठी विविध प्रकारच्या ऑनलाइन ॲपद्वारे, नजीकच्या किराणा, भाजीपाला दुकानातून व्हॉटसअपद्वारे किंवा घरकामगार, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांमार्फतही या वस्तू मागविता येतील.

यांचीही मिळेल मदत

- तुमच्या नजीकचे पोलिस ठाणे

- तुमच्या सोसायटीचे पदाधिकारी

- तुमच्या भागातील सामाजिक संघटना

- राजकीय पक्षांचे कार्यकर्ते

- गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते

ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोणतीही अडचण आल्यास नजीकचे पोलिस ठाणे, भरोसा सेल व स्पेशल पोलिस ऑफिसर (एसपीओ) यांना सांगावी. त्यांच्याकडून नागरिकांना तत्काळ मदत मिळू शकेल.

- डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त

ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, मानसिक स्थिती चांगली राहावी, यासाठी आम्ही २० प्रकारचे वेबीनार घेतले. केवळ तेवढ्यावरच न थांबता वयस्कर, गरीब, दिव्यांग, एकाकी ज्येष्ठ नागरिकांना कशी मदत मिळवून देता येईल, यासाठीही मार्गदर्शन केले आहे.

- अरुण रोडे, राज्य अध्यक्ष, फेस्कॉम

ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही मदत लागल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही हेल्पलाइन चालविण्याची जबाबदारी जनसेवा फाउंडेशनकडे सोपविली आहे.

- डॉ. विनोद शहा, अध्यक्ष, जनसेवा फाउंडेशन

टॅग्स :pune