OLXवर खरेदी-विक्री करत असाल तर, सावधान; पुण्यात दोघांची फसवणूक

टीम ई-सकाळ
मंगळवार, 21 जानेवारी 2020

अनोळखी व्यक्तींनी ओएलएक्‍स या ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या वेबसाईटवर दुचाकी विक्री करण्यासाठी दुचाकीची छायाचित्रांची जाहीरात केली होती.

पुणे : ओएलएक्‍सवर दुचाकी विक्रीची जाहिरात करुन, आपण लष्करातील जवान असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने एकाची तब्बल दिड लाख रुपयांची फसवणूक केली. याबरोबरच आणखी एका तरुणास बॅंक अधिकारी असल्याचे सांगून त्यास 20 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. या दोन्ही घटनांबाबत सिंहगड व चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी माधव महाबळेश्वरकर (वय 50, रा. वडगाव बुद्रुक, धायरी) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी ओएलएक्‍स या ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या वेबसाईटवर दुचाकी विक्री करण्यासाठी दुचाकीची छायाचित्रांची जाहीरात केली होती. फिर्यादी यांनी संबंधीत जाहीरातीवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने स्वतःची ओळख लष्करातील जवान असल्याची करुन दिली होती. त्यानंतर फिर्यादी व अनोळखी व्यक्ती यांच्यात दुचाकीबाबतचा व्यवहार ठरला. त्यानंतर संबंधीत व्यक्तीने दुचाकी रेल्वेने पाठविली असल्याचे सांगून दुचाकीचे पैसे देण्याची मागणी केली. त्यानुसार, अनोळखी व्यक्तीने सांगितल्यानुसार, फिर्यादी यांनी ऑनलाईन पद्धतीने दिड लाख रुपयांची रक्कम पाठवून दिली. त्यानंतर त्यांनी दुचाकीबाबत विचारणा करण्यासाठी फोन केला, त्यावेळी त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

आणखी वाचा - कॉलगर्ल निघाली त्याचीच बायको

बँक अधिकारी असल्याचा बनाव
दरम्यान, उमरकासीम चिक्काळी (वय 26, रा. चंदननगर) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांना एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरुन फोन आला. त्याने आपण बॅंक अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन केला. क्रेडीट कार्डची सेवा बंद करण्यात येत आहे. त्यासाठी माहिती अद्ययावत करायचे काम सुरू असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या डेबीट कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या खात्यातील 20 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: olx pune fraud fake defence man looted two men