हुश्‍श! संपला एकदाचा उन्हाळा 

हुश्‍श! संपला एकदाचा उन्हाळा 

पुणे - यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्र अक्षरशः भाजून निघालाय. एकामागून एक येणाऱ्या उष्णतेच्या लाटेत विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लोक होरपळले. पण, हा कडक उन्हाळा आता संपतोय. पुढील 38 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उष्णतेची तीव्रता कमी होईल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे गुरुवारी (ता. 6) देण्यात आली. पुढील 72 तासांमध्ये देशातील उष्णतेच्या लाटेची व्याप्ती आणि त्याची तीव्रताही कमी होणार असल्याचे सांगण्यात आले. 

यंदाचा उन्हाळा खरेच भयंकर होता. पुण्यात तर शतकातील सर्वाधिक म्हणजे 43 अंश सेल्सिअस तापमान एप्रिलमध्ये नोंदले गेले. विदर्भातही कमाल तापमानाचा पारा सातत्याने 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदला गेला. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष आणि दुसरीकडे उन्हाचा चटका, अशी स्थिती महाराष्ट्राने अनुभवली. या वेळेचा उन्हाळा नेमका कसा होता, हे सांगताना भारतीय हवामान खात्यातील हवामानतज्ज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव म्हणाले, ""यंदा महाराष्ट्रात उन्हाळा कडक होता. उन्हाळ्याच्या सुरवातीला विदर्भात उष्णतेची लाट होती. त्यानंतर ही लाट तेलंगणमध्ये पसरली. त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही ही लाट पसरली. महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेने तापल्यानंतर राजस्थान उन्हाच्या चटक्‍याने तापू लागले. यंदा राजस्थानमध्ये सुरवातीला उष्णतेची लाट अजिबात जाणवली नाही.'' 

""आत्ताही विदर्भातील बहुतांश भागांत उष्णतेची लाट आहे. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. परंतु, आता मॉन्सून केरळच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उष्णतेची लाट ओसरली. विदर्भात मात्र आणखी काही दिवस उन्हाचा चटका कायम राहील. पण, कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने कमी होईल. महाराष्ट्राबरोबरच राजस्थानमध्येही उष्णतेची लाट कमी होण्याचे संकेत आहेत,'' असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून उन्हाचा चटका कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com