पोलिस भरतीच्या आमिषाने फसवणाऱ्याला सव्वातीन वर्षांनी अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

भरती करण्यासाठी आरोपींनी प्रत्येकाकडून एक लाख 50 हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना नोकरी न लावता सर्वांची एकूण 30 लाख रुपयांची फसवणूक केली. घेतलेले पैसे परत मागितले असता आरोपींनी शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. 

पुणे : पोलिस भरतीचे आमिष दाखवून 20 मुलांची तब्बल 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणातील एका संशयित आरोपीला सहकारनगर पोलिसांनी तब्बल सव्वातीन वर्षांनी अटक केली आहे.

 विवेक विष्णू पंचरास (वय 32, रा. लोणी, ता. आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत किसन निवृत्ती शिंदे (वय 47) यांनी ऑगस्ट 2016 रोजी फिर्याद दिली आहे. 15 डिसेंबर 2013 ते 2014 या कालावधीत ही घटना घडली होती. 

शिंदे यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या ओळखीच्या अशा 20 जणांना पोलिस दलात नोकरी मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. भरती करण्यासाठी आरोपींनी प्रत्येकाकडून एक लाख 50 हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना नोकरी न लावता सर्वांची एकूण 30 लाख रुपयांची फसवणूक केली. घेतलेले पैसे परत मागितले असता आरोपींनी शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादींसह इतरांना तत्कालीन गृहमंत्र्यांची सही असलेले बनावट पत्र दिले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

याप्रकरणी पंचरास याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने त्याला आठ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested after 3 years for Fraud for Police recruitment