सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

कामावरून काढून टाकल्याचा बदला घेण्यासाठी दुकानमालक व त्यांच्या पत्नीच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट काढून त्यावर अश्‍लील फोटो व त्यांचा नंबर टाकून बदनामी करणाऱ्या नोकरास सायबर शाखेने अटक केली. 

पुणे - कामावरून काढून टाकल्याचा बदला घेण्यासाठी दुकानमालक व त्यांच्या पत्नीच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट काढून त्यावर अश्‍लील फोटो व त्यांचा नंबर टाकून बदनामी करणाऱ्या नोकरास सायबर शाखेने अटक केली. 

आत्माराम प्रकाश बेळगे (रा. कसबा पेठ, मूळ रा. वाळूंज, पाथर्डी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचे ई-सेवा केंद्र आहे. आत्माराम शेडगे हा तेथे कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला अनोळखी व्यक्तींकडून अनेकदा फोन येऊ लागल्याने मानसिक त्रास होत होता. त्यांनी आमचा नंबर कोणी दिला असे फोन करणाऱ्यांना विचारले असता, त्यातील एकाने तुमचे फोटो आणि फोन नंबर फेसबुकवर असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी याबाबत सायबर शाखेकडे तक्रार केली. सायबर शाखेने केलेल्या तपासात फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट काढण्यात आले आहे. त्यामध्ये ‘मला कधीही फोन करा’ अशा आशयाचा इंग्रजीमध्ये मजकूर लिहून त्यात दोघांचेही मोबाईल क्रमांक टाकल्याचे स्पष्ट झाले. 

पोलिस उपायुक्त संभाजी कदम, पोलिस निरीक्षक राधिका फडके, जयराम पायगुडे यांच्या पथकाने त्याचा तपास केला. तांत्रिक माहितीचे विश्‍लेषण केले असता हे बनावट अकाउंट बेळगे याने काढल्याचे समोर आले. त्यानुसार उपनिरीक्षक मंदा नेवसे, कर्मचारी हर्षल दुसाने, ज्योती कदम यांच्या पथकाने बेळगेला अटक केली.  बेळगेकडे केलेल्या चौकशीत तो फिर्यादी यांच्या ई-सेवा केंद्रामध्ये नोकरीला होता. कामावरून त्याचे फिर्यादींशी भांडण झाल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. त्याचा बदला घेण्यासाठी त्यांची सोशल मीडियावरून बदनामी केल्याचे समोर आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested Defamation from Social Media