एक कोटीची औषधे कचऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने २०१४-१५ मध्ये खरेदी केलेली सुमारे एक कोटी रुपये किमतीची गोळ्या-औषधे भंगारात टाकण्यात आलेल्या टेंपोमध्ये दडवून ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी (ता. ९) उघडकीस आला.

पुणे - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने २०१४-१५ मध्ये खरेदी केलेली सुमारे एक कोटी रुपये किमतीची गोळ्या-औषधे भंगारात टाकण्यात आलेल्या टेंपोमध्ये दडवून ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी (ता. ९) उघडकीस आला. दरम्यान, या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी गंभीर दखल घेत सखोल चौकशी करण्याचा आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिला.

भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी हा प्रकार उजेडात आणला. कोरेगाव पार्क येथे जिल्हा परिषदेचे गोदाम आहे. त्याच्या परिसरात पार्क करण्यात आलेल्या भंगारातील बंद टेंपोमध्ये कोट्यवधी रुपयांची गोळ्या-औषधे दडवून ठेवल्याची कुणकुण बुट्टे पाटील यांना लागली होती. त्यानुसार त्यांनी याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित गाड्यांची कुलपे समक्ष उघडण्यास भाग पाडले. कुलपे उघडल्यानंतर या गाड्यांमध्ये सुमारे १५० बॉक्‍समध्ये लहान मुलांसाठीच्या पॅरॉसिटामल सिरपच्या हजारो बाटल्या, रक्तवाढीच्या गोळ्या आणि रक्ततपासणी किट असे सुमारे १ कोटी रुपये किमतीच्या गोळ्या-औषधे आढळून आली. ही औषधे वापरण्याची अंतिम तारीख २०१६ आहे. तरीही ती मागील तीन वर्षांपासून तशीच दडवून ठेवल्याचा आरोप बुट्टे पाटील यांनी केला आहे.

दोषींवर कारवाई करणार - माने 
दरम्यान, ही औषधे मागील पाच वर्षांपूर्वीची आहेत. गेल्या पाच वर्षांत चार ते पाच जिल्हा आरोग्य अधिकारी होऊन गेले आहेत. त्यामुळे नेमका हा प्रकार कोणत्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झाला आणि यासाठी जबाबदार कोण, याची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One crore drugs waste