एक दिवस विजेशिवाय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पुणे - घरामध्ये मोबाईल चार्ज करता येत नाही, पंप बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी नाही, घराबाहेर पडलो तर सिग्नल बंद असल्याने चौकाचौकात झालेली वाहतूक कोंडी, असे पुणेकरांचे गुरुवारी सकाळपासून हाल झाले. कारण काय तर महापारेषण कंपनीच्या मनोऱ्याची उंची वाढविण्याच्या कामासाठी दिवसभर बंद ठेवण्यात आलेला वीजपुरवठा. 

पुणे - घरामध्ये मोबाईल चार्ज करता येत नाही, पंप बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी नाही, घराबाहेर पडलो तर सिग्नल बंद असल्याने चौकाचौकात झालेली वाहतूक कोंडी, असे पुणेकरांचे गुरुवारी सकाळपासून हाल झाले. कारण काय तर महापारेषण कंपनीच्या मनोऱ्याची उंची वाढविण्याच्या कामासाठी दिवसभर बंद ठेवण्यात आलेला वीजपुरवठा. 

यामुळे वीजपुरवठा बंद
कात्रज-देहूरस्ता बायपास मार्गावरील मनोऱ्याची उंची वाढविण्याच्या कामासाठी सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत पर्वती व रस्ता पेठ या वीज केंद्रांना पुरवठा करणाऱ्या २२० केव्ही वीजवाहिनीवरील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या दोन्ही केंद्रांच्या अंतर्गत शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा, लगतचा परिसर आणि काही उपनगराचा भाग येतो. त्यामुळे या भागात वीजपुरवठा बंद होता. 

काय झाला परिणाम 
- सोसायटीच्या टाकीला पाणीपुरवठा न झाल्याने कटकसरीने पाणी वापरण्याची वेळ रहिवाशांवर आली. 
- जनरेटरची व्यवस्था नसलेल्या दुकानदारांना पारंपरिक पद्धतीने बिले करावी लागली
- हॉटेल व्यावसायिकांनादेखील फटका बसला 
- रस्त्यावरील सिग्नल बंद पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी 
- शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्याच्या परिसरात सकाळपासून वाहतूक कोंडीचे चित्र
- बॅंकांवर विशेष परिणाम जाणवला नाही. काही ठिकाणी एटीएम बंद 
- बॅकअपमुळे मोठ्या रग्णालयांवर परिणाम नाही.
- रसवंती गृह, छोट्या व्यावसायिकांवर मात्र मोठा परिणाम

शहरातील बहुतांश छोट्या हॉस्पिटलनी बॅकअपची व्यवस्था केली आहे. त्यामुळे वीजपुरवठा बंद राहिला किंवा खंडित झाला, तरी त्याचा रग्णसेवेवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे वीज नसल्याचा फारसा परिणाम झाला नाही.
 डॉ. मंदार रानडे (स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ)

दिवसभर वीजपुरवठा बंद राहिल्याने व्यवसायावर परिणाम झाला. सायंकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला. दर गुरुवारी काही वेळासाठी वीजपुरवठा खंडित होतो. आज मात्र सायंकाळपर्यंत वीजपुरवठा न झाल्याने व्यवसाय होऊ शकला नाही.
 दत्तात्रय चव्हाण (ईस्त्री व्यावसायिक)

वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे माहिती होते. त्यामुळे आज दिवसभराचा व्यवसाय बुडाला. तीन हजार रुपयांचे नुकसान झाले.
 अनिल बिडलान (फ्लेक्‍स व्यावसायिक ) 

ऐन उन्हाळ्यात वीज नसल्यामुळे उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. तसेच वॉशिंग मशिन, मिक्‍सर अशी उपकरणेही वापरता न आल्यामुळे दैनंदिन कामाला उशीर झाला. 
 गंगा मांगले, हिंगणे, सिंहगड रस्ता

Web Title: One day without electricity