
-संतप्त ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना घेराव.
-महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावच्या फाट्यावर बुधवारी सायंकाळी पुन्हा एक अपघात होऊन गावामधील ज्येष्ठ नागरीकाचा बळी गेला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून, त्यांनी या अपघात प्रकरणी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी करत रात्री पोलिस चौकीवर ठिय्या मांडला होता व आज सकाळपासून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बुधवार (ता. 6 रोजी) सायंकाळी सहाच्या सुमारास गावामधील जेष्ठ नागरीक किसन ज्ञानबा बदक हे रस्त्याच्या पलीकडील शेतामधून पुन्हा घराकडे येत असताना कापुरव्होळ बाजूकडून सेवा रस्ता नसल्याने हरिश्च्ंद्री गावाकडे सातारा-पुणे लेनवरील ओढ्याच्या पुलावरुन येत असताना मागून सातारा बाजूकडून येणाऱ्या बोलेरो जिप क्रमांक एमएच 12 एएच 8579 ने बदक यांना जोरदार ठोकर मारली. गावामधील ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले परंतू उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
रस्ता पार करण्याची सुविधा नसल्याने गावामधील हा 21 वा बळी आहे. या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यांनी रात्री उशीरापर्यंत किकवी पोलिस चौकीसमोर ठिय्या मांडून या अपघात प्रकरणी जीप चालका बरोबर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकऱ्यांना देखिल जबाबदार धरुन त्यांच्यावर देखिल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शेवटी रात्री उशीरा उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील व पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांनी ग्रामस्थांना गुन्हा दाखल करण्याची हमी दिल्यावर रात्री उशीरा ग्रामस्थ गावात परत आले.
आज (ता. 7 रोजी) सकाळी फक्त जीप चालक मनोज भोकरे रा. तळेगाव दाभाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती मिळाल्यावर ग्रामस्थांनी पुन्हा अक्रमक पवित्रा घेत महामार्ग प्रधिकरणाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदार रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना गावात बोलावून घेराव घातला आहे व सदर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. अपघातग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी व रस्ता पार करण्यासाठी होणाऱ्या भुयारी मार्गाचा कालावधी जाहीर करावा अशी मागणी लावून धरली आहे. तणाव निर्माण होऊन अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने मोठा फौजफाटा या ठिकाणी नेमण्यात आला आहे.
हे वाचा - चला भटकायला ; पुण्यातले किल्ले, ऐतिहासिक वास्तू खुल्या
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने राम पाचकाळे, चंदुभैय्या परदेशी, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष संतोष मोहिते आदींनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली परंतू मार्ग निघू शकला नाही.
(संपादन : सागर डी. शेलार)