कालव्यात कार कोसळून एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

परिसरातील मुळा-मुठा कालव्यावरील वाकड्या पुलावरून मोटार कोसळल्याने पाण्यात बुडून क्रीडा शिक्षकाचा मृत्यू झाला. सोलापूर रस्त्याकडे जाणाऱ्या फुरसुंगी-सोनार पूल मार्गावर शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली. 

फुरसुंगी: परिसरातील मुळा-मुठा कालव्यावरील वाकड्या पुलावरून मोटार कोसळल्याने पाण्यात बुडून क्रीडा शिक्षकाचा मृत्यू झाला. सोलापूर रस्त्याकडे जाणाऱ्या फुरसुंगी-सोनार पूल मार्गावर शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली. 

नितीन निवृत्ती कुंभार (वय 46, रा. कुंभारवाडा, सासवड) असे या अपघातातील मृताचे नाव आहे. ते लोणी काळभोर येथील एंजेल हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक होते. रविवारी सकाळी फुरसुंगीतील नागरिक वाकड्या पुलावर मॉर्निंग वॉकसाठी जात गेले असताना त्यांना मोटार कालव्यात पडलेली दिसली. याबाबत त्यांनी पोलिस व अग्निशामक दलाला माहिती दिली. या मोटारीचा पुढचा भाग पूर्णपणे पाण्यात बुडाला होता. पोलिस येण्यापूर्वी ग्रामस्थांनी दोराच्या साहाय्याने ही मोटार काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यशस्वी आले नाही. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ही मोटार पाण्याबाहेर काढण्यात आली. कुंभार हे गाडीत मृतावस्थेत आढळले. 

अपघाताचा पूल! 
मुळा-मुठा कालव्यावरील हा पूल वाकडा पूल म्हणून ओळखला जातो. तो कमी लांबीचा असूनही त्यावर दोन वळणे आहेत. या वळणांमुळे वाहने कठड्यांना धडकून कालव्यात पडल्याने आतापर्यंत सहा ते सात अपघात झाले आहेत. हा पूल जुना झाला असून या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची मागणी नागरिकांनी महापालिकेकडे अनेकदा केली आहे. मात्र हे काम न झाल्याने अनेक अपघात झाले आहेत. 

सव्वा कोटी खर्च अपेक्षित 
महापालिकेचे उपायुक्त सुरेश जगताप म्हणाले की, या ठिकाणी नवा पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी अंदाजे सव्वा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी सल्लागार नेमणे, पुलाचा आराखडा तयार करणे इत्यादी कामे पथ विभागाकडून सध्या प्राथमिक स्थरावर सुरू आहेत.

Web Title: One killed in car collapse in the canal