खळबळजनक! पुण्यात आयटी हबमध्ये 25 किलो गांजासह तरुणाला अटक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

एकीकडे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील अमंली पदार्थांचा विषय चर्चेत असताना पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

पुणे - एकीकडे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील अमंली पदार्थांचा विषय चर्चेत असताना पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. हिंजवडीत असलेल्या आयटी हबमध्ये सुमारे 25 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत जवळपास 6 लाख 40 हजार रुपये किलो इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. हिंजवडी इथं गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव योगेश्वर गजानन फाटे असं आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंजवडी फेज दोन इथं असलेल्या राजीव गांधी आयटी पार्कमध्ये गांजा विकण्यासाठी तरुण येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला समजली होती. त्यानंतर सापळा रचून अमंली पदार्थ विरोधी पथकाने योगेश्वर गजानन फाटे राहणार गोखले नगर या तरुणाला अटक केली. त्याच्याजवळ असलेल्या बॅगेत 6 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा 25 किलो 606 ग्रॅम गांजा सापडला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांच्यासोबत पोलिस कर्मचारी शाकिर जेनेडी आणि संदीप पाटील यांनी गांजासह तरुणाला पकडलं. 

हे वाचा - कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य; भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा दावा, कॉंग्रेसचा विरोध का?

लॉकडाऊनच्या काळात गांजा विक्री जवळपास बंदच झाली होती. दरम्यान, हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर राज्यातील गांजा विक्रिचे रॅकेट सक्रीय झालं. झोपडपट्टी भागात स्वस्तात मिळणाऱ्या गांजाला आयटी हबमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते. तसंच त्याला दरही जास्त मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one person arrested with 25 kg cannabis in it park pune