गौरी लंकेश यांच्या हत्येचे धागेदोरे चिंचवडमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

पिंपरी : कर्नाटक, बंगळूर येथील लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चिंचवडमध्ये राहणारे अमोल अरविंद काळे यांना संशयित म्हणून विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) ताब्यात घेतले. काळे हे मूळचे आंबेगाव तालुक्‍यातील घोडेगावचे रहिवासी असल्याने लंकेश हत्या प्रकरणाचे धागेदोरे चिंचवड व्हाया घोडेगावपर्यंत पसरले आहेत. 

पिंपरी : कर्नाटक, बंगळूर येथील लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चिंचवडमध्ये राहणारे अमोल अरविंद काळे यांना संशयित म्हणून विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) ताब्यात घेतले. काळे हे मूळचे आंबेगाव तालुक्‍यातील घोडेगावचे रहिवासी असल्याने लंकेश हत्या प्रकरणाचे धागेदोरे चिंचवड व्हाया घोडेगावपर्यंत पसरले आहेत. 

माणिक कॉलनी, चिंचवड येथील अक्षय प्लाझाच्या बी विंगमध्ये काळे कुटुंबीयांसोबत गेल्या दहा वर्षांपासून राहतात. काळे यांना गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून एसआयटीने ताब्यात घेतले. त्यांचे कुटुंब एका हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. 

अमोल यांच्या वडिलांचा पिंपरी कॅम्पात पानविक्रीचा व्यवसाय होता. 23 मे रोजी कर्नाटक पोलिसांचे एक पथक त्यांच्या घरी गेले व त्यांनी घराची झडती घेतली. त्यापूर्वी कर्नाटकातील उप्परपेट जिल्ह्यातील पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात त्यांना अटक केली होती. त्यानंतर लंकेश यांच्या हत्याप्रकरणी अमोल यांना एसआयटीकडे वर्ग करण्यात आले. 

काळे कुटुंबीय गेल्या महिन्याभरापासून तणावात असल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांनी सांगितले. 

गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळूरमधील त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून अज्ञातांनी हत्या केली होती. या हत्येप्रकरणातील आरोपी के. टी. नवीनकुमार याच्या विरोधात एसआयटीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाच जणांना एसआयटीने अटक केली. त्यामध्ये काळे यांचाही समावेश आहे. 

एसआयटीने केलेल्या तपासात या पाच आरोपींकडून 74 सिमकार्ड आणि 22 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. यापैकी बहुतांश सिमकार्ड पुण्यातून खरेदी केलेली आहेत. 
याबाबत त्यांच्या पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मला याबाबत काहीच बोलायचे नाही, असे सांगत दरवाजा बंद केला. तसेच, इमारतीमधील नागरिकही याबाबत घाबरलेले दिसून आले. 

अमोल हे फार कमी वेळा घरी असतात. त्यांचा कशाचातरी ट्रेडिंगचा व्यवसाय असल्याची जुजबी माहिती शेजाऱ्यांना आहे. ते मूळचे घोडेगाव येथील रहिवासी असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.

Web Title: One suspect arrested in Chinchwad in Gauri Lankesh murder case