लोकशाहीसाठी एक मतही महत्त्वाचे - डॉ. दीपक म्हैसेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

‘तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा; तसेच नवमतदारांनी मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

पुणे - ‘तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा; तसेच नवमतदारांनी मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. २५) राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘प्रत्येक पात्र व्यक्‍तीने मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा, हा निवडणूक आयोगाचा संकल्प आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदार नोंदणी करून राष्ट्राच्या जडण-घडणीत आपला सहभाग नोंदवावा.’’ जिल्हाधिकारी राम म्हणाले, ‘‘प्रत्येक मतदाराने मतदान करून इतर मतदारांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे.

मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी. दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्तींना मतदानासाठी सुविधा देण्यात येत आहेत.’’ पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, ‘‘ प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावणे आवश्‍यक आहे.’’

मतदार दिवसानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर दिव्यांग, तृतीयपंथी मतदार आणि नवमतदारांना निवडणूक ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.

उपस्थितांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रतिज्ञा दिली. उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, उत्कृष्ट पर्यवेक्षक, उत्कृष्ट अधिकारी आणि स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One vote is important for democracy dr deepak mhaiskar