एकेरी वाहतुकीमुळे परीक्षार्थींची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक बदलाचा विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एकेरी वाहतुकीचा निर्णय रद्द करण्यात येत असून, जलवाहिनी टाकण्याच्या कामाला परीक्षेनंतर परवानगी देण्यात आली आहे. 
- कल्पना बारवकर, उपायुक्त, वाहतूक विभाग  

औंध - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते अभिमानश्री सोसायटीपर्यंत सत्तावीस इंची जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी वाहतूक विभागाकडून या रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय वाहतूक विभागातर्फे घेण्यात आला होता. परंतु दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून, त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याने वाहतूक बदलाचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.  

वाहतूक विभागाकडून आजपासून (ता. ८) हा वाहतूक बदल होणार होता. पहिल्याच दिवशी विद्यापीठ चौकात आणि परिसरात कोंडी झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेवर पोचता आले नाही. या वाहतूक कोंडीचा फटका लॉयला, सेंट जोसेफ, मॉडर्न शाळा व महाविद्यालय, एनसीएल आदी शाळांतील परीक्षार्थींना बसला. आज सकाळपासूनच विद्यापीठ चौक ते ग्रीनपार्क चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला.  

दरम्यान, विविध संघटनांनी आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक बदलाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. तसेच नागरिकांच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. शिवसेनेच्या वतीने वाहतूक विभागाच्या निर्णयाविरोधात विद्यापीठ चौकात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर याबाबतचे निवेदन वाहतूक विभागाला देण्यात आले. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात आल्याचे वाहतूक विभागातर्फे सांगण्यात आले. 

सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक बदलाचा विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एकेरी वाहतुकीचा निर्णय रद्द करण्यात येत असून, जलवाहिनी टाकण्याच्या कामाला परीक्षेनंतर परवानगी देण्यात आली आहे. 
- कल्पना बारवकर, उपायुक्त, वाहतूक विभाग  

Web Title: one way Examine trouble