एकेरी वाहतुकीला ‘ग्रहण’

हिंजवडी - शिवाजी चौक परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रयोगामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास अडथळा येत आहे.
हिंजवडी - शिवाजी चौक परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रयोगामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास अडथळा येत आहे.

पिंपरी - हिंजवडीतील शिवाजी चौक परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एकेरी वाहतुकीचा उपक्रम पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. मात्र, पीएमपी बसचा विस्कळितपणा, बसथांबे, बेशिस्त पार्किंग व वाहतूक, रस्ता नसल्याने घुसखोरी करणारे स्थानिक, रस्त्यावर पडलेली खडी, अशा समस्यांच्या गर्तेत हिंजवडीतील एकेरी वाहतूक अडकली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून वरिष्ठ पोलिस अधिकारी सकाळी आणि संध्याकाळी शिवाजी चौकामध्ये तळ ठोकून आहेत. एकेरी वाहतुकीचा प्रयोग सुरू झाल्यानंतर शिवाजी चौकामध्ये दोन लेनमधून वाहने येतात. पुढील रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस एका लेनमधील वाहने सोडतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण होत आहे. शिवाजी चौकातून भूमकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावर पीएमपी बस प्रवासी घेण्यासाठी थांबतात. त्याचा परिणाम येथील वाहतुकीवर होत आहे. संध्याकाळी कंपन्यांच्या आणि पीएमपीच्या बसची येजा मोठ्या संख्येत वाढते. त्या वेळी हा गोंधळ आणखी वाढतो. पावसामुळे शिवाजी चौक परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात खडी वर आली आहे. त्यामुळे दुचाकी घसरून अपघाताचे प्रकार घडू शकतात. याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आहे. एकेरी वाहतुकीचा प्रयोग सुरू झाला असला तरी रस्त्याच्या बाजूला वाहनांचे पार्किंग सुरूच आहे. 

हिंजवडीत केलेल्या चक्राकार वाहतुकीच्या प्रयोगामुळे पीएमपीच्या बसचे मार्गदेखील पूर्णपणे बदलले आहेत. त्यामुळे बस पकडण्यासाठी आम्हाला दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 
- मदन पाटील, कर्मचारी

चक्राकार वाहतुकीमुळे कासारसाई, मारुंजी गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना वळसा घालून जावे लागत आहे. शिवाजी चौक परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबवताना स्थानिक नागरिकांचा विचार होण्याची आवश्‍यकता आहे. 
- सचिन भोसले, स्थानिक नागरिक 

हिंजवडीत वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाचे चांगले परिणाम दिसत आहेत. गुरुवारी (ता. ६) या भागातील वाहतूक सकाळी साडेनऊ वाजताच मोकळी झाली होती. पीएमपी बस पकडण्यासाठी होणारा त्रास सोडवण्यासाठी पीएमपी अधिकाऱ्यांना भेटून त्यांना ही अडचण सांगणार आहे. 
- किशोर म्हसवडे, पोलिस निरीक्षक, वाहतूक, हिंजवडी

नऊ दुभाजक तुटलेले
शिवाजी चौक परिसरातील नऊ ठिकाणी दुभाजक तुटलेले आहेत. त्याची दुरुस्ती करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि एमआयडीसी यांच्याबरोबर वाहतूक पोलिसांनी पत्रव्यवहार सुरू केला आहे. याचा पाठपुरावा करून दुरुस्तीचे काम तत्काळ पूर्ण करण्यात येणार आहे. 

नो पार्किंग करणार
गर्दीच्या वेळेत शिवाजी चौकातून जाणाऱ्या रस्त्यावर नो पार्किंग करण्याची वाहतूक पोलिसांची योजना आहे. नागरिकांकडूनदेखील सूचना मागवण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com