हडपसर उड्डाणपुलाखालून १ वर्षाच्या बाळाचे अपहरण; आठवड्यातील दुसरी घटना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

शर्मिली या गाडीतळ उड्डाणपूलाखाली आपल्या दोन मुलांसोबत रात्री झोपी गेल्या होत्या. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कार्तिक झोपलेल्या ठिकाणी नव्हता.

हडपसर (पुणे) : गाडीतळ उड्डाणपूलाखालून एक वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले आहे. याबाबत अज्ञात इसमाविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी (ता.२३) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

गेल्या आठवड्यात ४ महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा बाळाचे अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कार्तिक निलेश काळे (रा. गाडीतळ पुलाखाली, मूळगाव, बाभळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अपहरण झालेल्या बाळाचे नाव आहे. याबाबत त्याची आई शर्मिली निलेश काळे (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे.

Video: आता सिगारेटची थोटकंही मोजली जाणार; पुण्यात 'चॉक फॉर शेम' मोहिम​

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिली या गाडीतळ उड्डाणपूलाखाली आपल्या दोन मुलांसोबत रात्री झोपी गेल्या होत्या. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कार्तिक झोपलेल्या ठिकाणी नव्हता. त्यामुळे आई आणि तिच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही.

काही लोकांकडून शर्मिलीला समजले की, काही वेळापूर्वी दोन महिला एका लहान मुलाला घेऊन पायी पटापट चालत सोलापूर रोडने सोलापूरच्या दिशेने गेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

काय सांगता! बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचं वय पाच वर्षांत वाढलं १२ वर्षांनी​

रंगाने सावळा, अंगामध्ये लाल रंगाचे जर्किंग आणि लाल टोपी, डाव्या कानात चांदीची बाळी, गळयात लाल रंगाचा दोरा, केस कापलेले आणि अंगावरती खरुज झाल्याने जखमेचे व्रण आहेत. अंगामध्ये पॅन्ट घातलेली नाही, असे वर्णन अपहरण झालेल्या मुलाचे वर्णन आहे.

एक दिवसापूर्वीच शर्मिली पुलाखाली राहणाऱ्या नातेवाईकांकडे आली होती. पुलाखाली त्यांचे काही नातेवाईक राहण्यास असतात. हाताला मिळेल ते काम करण्याच्या हेतूने शर्मिली या हडपसरला आल्या होत्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One year old boy has been abducted from under a flyover in Hadapsar