चाळीतील कांदा सडू लागला; शेतकरी हवालदिल

युनूस तांबोळी
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

सहा महिने कांदा चाळीत पडून आहे. सरकारने कांदा निर्यात केला; पण शेतकऱ्यांच्या मालाला बाजार दिला जात नाही. जुना कांदा बाजारपेठेत येऊ देत नाही. शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकविलेल्या मालाचा पंचनामा करून त्यांना अनुदान देऊन पाठीशी उभे राहावे.
- सखाराम खामकर, माजी उपसरपंच, टाकळी हाजी

टाकळी हाजी (पुणे): कांद्याला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी व साठवण क्षमता वाढण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देऊन कांदा चाळी बांधल्या. आयात निर्यातीचे धोरण चुकीच्या पद्धतीने राबविल्याने कांद्याचे भाव पडले. भविष्यात भाव मिळेल या अपेक्षेने ठेवलेला कांदा चाळीत सडू लागला आहे. यामुळे पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून येऊ लागली आहे.

शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी घोड व कुकडी नद्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन केले. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतीचा कांदा पिकविण्यात आला. यासाठी जवळपास एकरी 60 हजार रुपये खर्च करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा विकला. त्या वेळीदेखील माती मोल भावाने हा कांदा विकला गेल्याची चर्चा शेतकरी करतात. केंद्र सरकारने कांदाचाळीसाठी अनुदान दिले असले तरी कांदाचाळी उभारण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याच पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात कोणतेच खेळते भांडवल नाही. उलट कर्जाचा बोजा घेऊन पुढच्या पिकाची तयारी करावी लागत आहे. त्यामुळे दरवर्षी कर्जाचा बोजा वाढत आहे. यावर्षी कांद्याला भाव मिळेल, अशी आशा असताना नवीन कांदा बाजारात आला, तरी कांद्याचे भाव स्थिर राहिले. त्यातून बाजारपेठेत जुना कांदा आणू नये, असे फलक झळकू लागल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. जुन्या कांदा चाळीतून आता पाणी निघून कांदा सडण्याचा प्रकार होत आहे. जनावरेदेखील या कांद्याला तोंड लावत नसल्याची चर्चा आहे.

Web Title: onion and farmer issue at shirur taluka pune