पुणे : कांदा उत्पादक पुन्हा संकटात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion prices down

पुणे : कांदा उत्पादक पुन्हा संकटात!

चाकण : कांद्याच्या भावात राज्यात सध्या मोठी घसरण सुरू झाली आहे. उन्हाळी कांद्याची आवक राज्यातील विविध बाजारात सुरू झाल्याने भाव मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. कांद्याचे भाव चाकण (ता. खेड) बाजारात अगदी नऊ रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

राज्यात पावसाळी कांद्याचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले होते. कांद्याच्या भावात मात्र काही फरक न पडता दर मागील काही महिन्यांत चढेच होते. यंदा उन्हाळी कांद्याचे लागवड क्षेत्र पुणे, नगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मार्च महिन्यात नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने आवक वाढत आहे.

रशिया-युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे. बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. परंतु, मागणी कमी असल्याने दरात मोठी घसरण होत आहे. अगदी वीस ते तेहतीस रुपये भावाने विक्री होत असलेले कांदे आता पंधरा रुपयांनी घसरले आहेत. कांद्याचे भाव पुढील काळात अजून घसरतील का? अशी भीती शेतकरी व व्यापाऱ्यांना आहे.

शेतकरी कांदा काढणीनंतर लगेच कांदा विक्रीला आणतो. त्यामुळे आवक वाढते आहे. सध्या मागणी कमी आहे. काही साठवणूकदार कमी भावाने कांदे खरेदी करून साठवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने लक्ष द्यावे

कांद्याचे भाव फारच गडगडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही वसूल होत नाही. कांद्याच्या भावातील घसरणीकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष द्यावे. निर्यात घटली आहे. त्याचा फटका भाववाढीला बसला आहे, असे चाकणमधील व्यापारी व निर्यातदार प्रशांत गोरे पाटील, बाजार समितीचे संचालक राम गोरे, माणिक गोरे, संपत पानसरे, बाळासाहेब सातपुते, जमीर काझी यांनी सांगितले.

चाकणच्या महात्मा फुले बाजारात बुधवारी (ता. २३) कांद्याची सुमारे दहा हजार पिशव्यांची आवक झाली. कांद्याला प्रतवारीनुसार प्रति किलोला अगदी कमी ९ ते १३ रुपये भाव मिळाला. गेल्या पंधरवड्यात भाव निम्म्याने घसरले आहेत. ही मोठी घसरण आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. भाव वाढले तरच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होईल नाहीतर शेतकरी दिवाळखोरीत जाईल.

- विनायक घुमटकर, सभापती, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: Onion Growers Crisis Again Prices Plummeted

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..