४५ पिशवी कांद्याची पट्टी अवघी ९५ रुपये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

वडगाव निंबाळकर - बारामती बाजार समितीत भाव नाही; म्हणून चोपडजच्या कानाडवाडीतील शेतकऱ्याने कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविला. पण तेथेही तीच अवस्था. सुमारे ४५ पिशव्यांची पट्टी आली अवघी ९५ रुपये. 

वडगाव निंबाळकर - बारामती बाजार समितीत भाव नाही; म्हणून चोपडजच्या कानाडवाडीतील शेतकऱ्याने कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविला. पण तेथेही तीच अवस्था. सुमारे ४५ पिशव्यांची पट्टी आली अवघी ९५ रुपये. 

अरविंद जयसिंग भोसले यांनी दोन एकर क्षेत्रापैकी एक एकरात कांद्याचे पीक घेतले आहे. दुसऱ्या एकरात घेतलेले उसाचे पीक जळाले आहे. कांद्याच्या पट्टीतून मजुरी व इतर खर्चही निघाला नसल्याने आता करायचे काय, असा प्रश्‍न भोसले यांना पडला आहे. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झालेत. निदान खर्च तरी निघेल या आशेने कांदा विविध शहरांतील मार्केटमध्ये पाठवून आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसून येत आहे. येथील कानाडवाडी भागातील अरविंद भोसले यांनीही तेच केले. भाव पडलेत म्हणताना पहिल्या ४५ पिशव्या कोल्हापूरच्या मार्केटला पाठवल्या; पण हाती काही लागले नाही. खर्च वजा जाता ९५ रुपयांची पट्टी पाहून त्यांनी कपाळाला हात लावत माध्यम प्रतिनिधींकडे आपली व्यथा मांडली. आमची दोन एकर शेती आहे. सुरवातीला बरा पाऊस झाल्याने एक एकरात ऊस लावण्याचे धाडस केले.

पण त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने गणित चुकले. केलेला खर्चही वाया गेला. पीक हातचे गेले, म्हणून दुसऱ्या एकरात कांदा केला. पण कांद्यानेही आता रडवले आहे. पहिली पट्टी पाहून बाकी शेतातला उर्वरित कांदा काढलाच नाही. तसाच गाडून टाकला आहे. दोन्ही पिके तोट्याने गेल्याने वर्षभर संसाराचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्‍न पडला आहे.

Web Title: Onion rate Decrease