वो भी दिन थे... जेव्हा वडापावच्या गाडीवर कांदा मिळायचा

सकाळ वृत्तसेवा
09.47 AM

कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे शहरातील अनेक हॉटेल, खाणावळी आणि वडापावच्या गाड्यांवरून कांदा गायब झाला आहे. व्हेज हॉटेलात ग्राहकांनी कांद्यासाठी वेगळे पैसे मोजण्याची तयारी ठेवली, तरी हॉटेलचालक कांदा देण्यास नकार देत आहे. त्यामुळे कांद्याची जागा आता कोबी, मुळा आणि काकडीने घेतली आहे. हाॅटेल व्यावसायिक राजेंद्र चोरघे म्हणाले की, दरवाढीमुळे खाद्यपदार्थांबरोबर कांदा देणे सध्या बंद केले आहे. परिणामी, ग्राहकांवर परिणाम झाला आहे. कांदा भज्याची प्लेट सुमारे २० रुपयांना मिळत असे. आता त्यामध्ये १० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

किरकोळ बाजारात किलोचा दर १६० रुपयांपर्यंत; सामान्यांच्या आवाक्यापलीकडे
मार्केट यार्ड - बाजारात सध्या कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार नवीन कांदा प्रतिकिलो ८० ते १३०, तर जुना कांदा १३० ते १६० रुपयांपर्यंत विकला जात आहे. यामुळे कांद्याने सामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. स्वयंपाक घरातून कांदा गायब झाल्याचे गृहिणींनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कांदा-बटाटा विभागात दररोज ३० ते ५० ट्रक कांद्याची आवक होत आहे. बुधवारी बाजारात जुना कांद्यांची १६ ते १८, तर नवीन कांद्याची २० ट्रक इतकी आवक झाली. इतरवेळी ही आवक सुमारे १०० ते १२० ट्रक होत असते. घाऊक बाजारात नवीन कांद्याला दहा किलोमागे ७०० ते ११०० रुपये, तर जुन्या कांद्याला १००० ते १४०० रुपयांचा दर मिळत आहे. तसेच चांगल्या प्रतीच्या जुना कांद्याला प्रतिक्विंटल १४  हजार, तर नव्या कांद्याला ११ हजार रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी गणेश यादव यांनी दिली.

संभाजी भिंडेना सहानुभूतीचा प्रश्नच नाही; जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण 

काही भागातील शेतकरी भाववाढीमुळे लवकर काढणी करून कांदा बाजारात आणत आहे. परंतु मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक अत्यल्प होत असल्याने भावात तेजी आहे. साधारणपणे पुढील दीड महिन्यानंतर कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत कांद्याचे भाव तेजीत राहण्याचा अंदाजही व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

बाजारात नवीन कांदा कमी येत असून त्याचा दर्जाही फारसा चांगला नाही. पावसाने नवीन कांद्याचे नुकसान होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. जुना कांदाही जवळपास संपल्यात जमा असल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे सरकारने इजिप्त, तुर्कस्तान या देशांतून कांदा आयात केला आहे. परंतु आयातीचे प्रमाण मागणीच्या तुलनेत कमी असल्याने कांद्याचे भाव सध्या तेजीत आहे.

काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी बंड केलं

दरम्यान, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजार आवारात नव्याने काढणी केलेल्या कांद्याला प्रतवारीनुसार पन्नास ते नव्वद रुपये किलोला भाव मिळाला. तर जुन्या मोठ्या कांद्याला सव्वाशे रुपये ते दीडशे रुपये किलोला भाव मिळाला.

कांद्याचा दर आता दीडशेच्या आसपास पोचला आहे. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यापलीकडचा आहे. यामुळे कांदा आता स्वयंपाक घरातून गायब झाला आहे.
- स्मिता कुलकर्णी, गृहिणी

भाव वाढल्याने १ ते २ किलो कांदा खरेदी करणारा ग्राहक सध्या अर्धा किलो कांदा खरेदी करत आहे. आम्ही घाऊक बाजारातून दोन-तीन गोण्या कांदा खरेदी करायचो. मात्र आता ती खरेदी ३०-४० किलोवर आली आहे.
- प्रकाश ढमेढेरे, किरकोळ विक्रेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion rate high in pune market