ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया हॅंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व एटीकेटी सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेत येण्यासाठी आज मनस्ताप सहन करावा लागला. अर्ज भरण्यात अडचणी येणे, गुणांमध्ये बदल करता न येणे अशा समस्या येत होत्या. त्यामुळे अनेकांना प्रवेश निश्‍चित करता आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात मोठी गर्दी केली होती.

पुणे - दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व एटीकेटी सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेत येण्यासाठी आज मनस्ताप सहन करावा लागला. अर्ज भरण्यात अडचणी येणे, गुणांमध्ये बदल करता न येणे अशा समस्या येत होत्या. त्यामुळे अनेकांना प्रवेश निश्‍चित करता आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात मोठी गर्दी केली होती.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात 296 कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या एक लाख चार हजार 139 प्रवेशाच्या जागा आहेत. राज्य मंडळाने घेतलेल्या फेरपरीक्षेत अनेक विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत मिळाल्याने ते अकरावीला प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी 14 सप्टेंबरपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली होती. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश ऑनलाईन निश्‍चित करायचा होता. त्यासाठी आज दुपारी एकपर्यंत मुदत होती.
अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज रिसेट करून त्यांचे गुण बदलायचे होते.

परंतु, लॉग इन होण्यात अडचणी येत होत्या. कनिष्ठ महाविद्यालयांत असणाऱ्या मार्गदर्शन केंद्रावरही त्यांना माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे कॅंपमधील शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थी व पालकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी सहापर्यंत ही गर्दी कायम होती. शहरातील बहुसंख्य मार्गदर्शन केंद्रावर योग्य माहिती मिळत नव्हती. तसेच काही ठिकाणी केंद्र बंद असल्याने गैरसोय झाल्याचीही तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

उपसंचालक कार्यालयात गर्दी झाल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा सामना करावा लागला. या कार्यालयातही योग्य माहिती मिळत नाही, अधिकारी बोलत नाहीत, अशी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची तक्रार होती.

कोणताही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. प्रवेशाच्या बहुतांश फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आता रिक्त जागांचा आढावा घेऊन राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून येत्या दोन दिवसांत प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यानुसार प्रवेशाची पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल.
- प्रवीण अहिरे, प्रभारी शिक्षण उपसंचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Admission Process Hang