ऑनलाइन अर्ज भरण्याचे इच्छुकांना धडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

पुणे - तिकीट मिळाल्यानंतर ऑनलाइन उमेदवारी अर्ज कसा भरायचा, तो कसा डाऊनलोड करायचा, त्याची प्रिंट कुठे सादर करायची, नव्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेतील अडथळे, अशा विविध तांत्रिक प्रश्‍नांची जाण राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी सोमवारी घेतली. या ऑनलाइनच्या "क्‍लास'ला आजी-माजी नगरसेवकांनीही हजेरी लावली होती. 

पुणे - तिकीट मिळाल्यानंतर ऑनलाइन उमेदवारी अर्ज कसा भरायचा, तो कसा डाऊनलोड करायचा, त्याची प्रिंट कुठे सादर करायची, नव्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेतील अडथळे, अशा विविध तांत्रिक प्रश्‍नांची जाण राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी सोमवारी घेतली. या ऑनलाइनच्या "क्‍लास'ला आजी-माजी नगरसेवकांनीही हजेरी लावली होती. 

या संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने निवडणुकीतील इच्छुक, त्यांचे समर्थक, इंटरनेट सायबर कॅफेमालक आणि चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह महापालिकेच्या तांत्रिक विभागाचे अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी या वेळी मार्गदर्शन केले. "स्लाइड शो'च्या माध्यमातून उपस्थितांना माहिती देण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला सुमारे सातशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी रंगमंदिरात तीन ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. 

निवडणूक निर्णय अधिकारी कुलकर्णी म्हणाले, ""या निवडणुकीत प्रथमच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, ती नवी असल्याने अर्ज भरताना अडचणी येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया समजावी म्हणून हा कार्यक्रम घेतला. अर्ज सादर करण्याची पद्धत, त्याची नेमकी "लिंक', संभाव्य अडचणी, त्यावरील उपाय तज्ज्ञांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्या. कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून त्या लगेच सोडविण्यात आल्या. त्यामुळे या प्रक्रियेत आता कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.'' 

वेळोवेळी मार्गदर्शन 
निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना इच्छुक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देण्यात येणार आहे. जेणे करून या प्रक्रियेमुळे अर्ज भरताना तातडीची मदत होईल. तसेच, प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रचार यंत्रणेलाही त्याची माहिती करून देण्यात येणार आहे. शहरातील सर्व भागांतील इंटरनेट कॅफे मालक आणि चालकांना याबाबत सूचना दिल्या आहेत, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: online application traning