ऑनलाइन फसवणुकीसाठी लष्करी अधिकारीही लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पुणे - बनावट ई-मेलद्वारे ऑनलाइन किंवा मोबाइलवर कॉल करून होणारी फसवणूक आता सामान्य नागरिकांपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. लष्करातील सध्याच्या आणि निवृत्त अधिकाऱ्यांना देखील या पद्धतीने फसवणुकीसाठी लक्ष्य केले जात असल्याचे प्रकार पुढे येऊ लागले आहेत.

पुणे - बनावट ई-मेलद्वारे ऑनलाइन किंवा मोबाइलवर कॉल करून होणारी फसवणूक आता सामान्य नागरिकांपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. लष्करातील सध्याच्या आणि निवृत्त अधिकाऱ्यांना देखील या पद्धतीने फसवणुकीसाठी लक्ष्य केले जात असल्याचे प्रकार पुढे येऊ लागले आहेत.

संरक्षण लेखा (डिफेन्स अकाउंट्‌स) विभागाने असे प्रकार घडत असल्याचे मान्य करत; कुणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. या विभागाचे प्रधान नियंत्रक (अधिकारी) ए. व्ही. राव यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'लष्करी अधिकाऱ्यांना पॅन कार्डच्या तपासणीबाबत बनावट ई-मेल येत आहेत. तसेच लेखा विभागातील अधिकारी असल्याची बतावणी करून निवृत्त अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बोनस मिळणार असल्याची खोटी माहिती दूरध्वनी किंवा मोबाइलवरून दिली जात आहे.''

राव म्हणाले, 'फसवणुकीच्या उद्देशाने लेखा विभागाच्या नावाने बनावट ई-मेल, कॉल करणारी टोळी कार्यरत असावी. अधिकारी किंवा लष्कराशी संबंधित कुणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही सूचना दिल्या आहेत. या विभागाने पॅन कार्डच्या पडताळणीसाठी कुणालाही ई-मेल वा मोबाइलवर लिंक पाठविलेली नसल्यामुळे असे ई-मेल वा लिंक आल्यास त्यावर क्‍लिक करू नये, असे त्यात स्पष्ट केले आहे.''

'निवृत्त अधिकाऱ्यांना काही लाखांचे बोनस, सवलती दिल्या जाणार असल्याचे सांगून फसवणुकीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी खबरदारीच्या सूचनेबरोबरच वित्तीय यंत्रणेचा दर चार महिन्यांनी आढावा घेत सुरक्षितता तपासली जाते. त्यामुळे यंत्रणेला कोणताही धोका नाही,'' असे राव यांनी सांगितले.

Web Title: Online Cheating Target Army Officer Crime